
Kasba By Election : कसबा चिंतन बैठक झाले गेले विसरा, पुन्हा कामाला लागा!
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाली. या निवडणुकीतील पराभवाची मीमांसा करताना झाले गेले आता विषय सोडून द्या,आगामी विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करा आणि पुन्हा मतदारसंघ काबीज करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
कसबा निवडणुकीच्या संदर्भाने बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईमध्ये बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ,भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे आदी यावेळी उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत २८ वर्षानंतर येथे विजय मिळवला. या निकालाची राज्यभर चर्चा होत असताना आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतही त्याचा परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा निकला लागल्यानंतर या कसब्यातील पदाधिकारी व शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक झाली.
त्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच नगरसेवकांनी पाच वर्ष व्यवस्थित काम न केल्याने मतदार नाराज असल्याचे बैठकीत सांगितले गेले. त्यानंतर मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बैठक घेतली.
कसबा मतदारसंघातील भाजपला हक्काची मते मिळणाऱ्या सदाशिव नारायण पेठ भाग असलेल्या प्रभाग १५ मध्ये मताधिक्य का घाटले? या मागची काय कारणे आहेत?, पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात चांगले मतदान झाले यामागे या मागचे कारण काय यावर चर्चा झाली. त्याच प्रमाणे गिरीश बापट, मुक्ता टिळक यांच्या निवडणुकांमध्ये कायम तिरंगी निवडणूक झाली.
त्यामुळे विरोधकांच्या मतांची विभागणी होत असल्याने त्याचा फायदा भाजपला होत होता. यापूर्वीच्या निवडणुकांमधील विरोधकांच्या मतांची बेरीज केली तर ती ९० हजाराच्या घरात जाते. पण या पोटनिवडणुकीत त्यांना ७२ हजार मते मिळाली आहेत. तर भाजपची मते तुलनेने कमी झालेली नाहीत. पण या निवडणुकीत यादृष्टीने डावपेच आखणे आवश्यक होते. प्रभाग १५ मध्ये मतदान जास्त झाले असते तर आणखी फरक पडला असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले.
बावनकुळे, पाटील यांनी हे म्हणणे ऐकून घेत कसबा मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला आहे. एका पराभवामुळे खचून न जाता पुन्हा कामाला लागा, नागरिकांची प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या, पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा असे आदेश दिले, असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात शहराध्यक्ष मुळीक यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘कसब्याच्या संदर्भाने मुंबईत बैठक झाली, पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.’’