काश्‍मिरात उद्योगांना चालना; रोजगार संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

एकत्र कुटुंब पाहून भारावलो
महाराष्ट्रात चाळीस-चाळीस लोकांची एकत्र कुटुंबे आहेत. ते सर्वजण एकत्र शेती करतात; हे पाहून आम्ही भारावलो आहोत. काश्‍मीरमध्येही आम्ही असा प्रयत्न करणार आहोत. इकडे सहकारी दूध उत्पादक संस्था शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज देतात. आमच्याकडे सहकारी संस्था नाही. हा प्रयोग आमच्या राज्यात करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्‍वास दिनेश सिंग यांनी व्यक्त केला.

३७० रद्द केल्यामुळे काश्‍मिरी शेतकऱ्यांची भावना; अभ्यासदौऱ्यासाठी पुण्यात आणणार
पुणे - डोंगरउतारावर असलेल्या आमच्या शेतावर सफरचंद, भाजीपाला, सुक्‍यामेव्याची शेती केली जाते. मात्र, बाजारपेठेला जोडणारे रस्ते आणि शेतीपूरक उद्योगांच्या अभावामुळे आमचे मोठे नुकसान होते. कलम ३७० हटविल्यामुळे आता प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल आणि नवीन रोजगाराच्या संधी मिळेल, असा विश्‍वास जम्मू-काश्‍मीरमधील डोडा जिल्ह्यातील शेतकरी हिंद भूषण यांनी व्यक्त केला. 

डोडा जिल्ह्याचे कृषी आयुक्त असलेले मराठी अधिकारी डॉ. सागर डोईफोडे आणि ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या सहयोगाने जम्मू-काश्‍मीरमधील पाच शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. यामध्ये बलवंत सिंग, बन्सी लाल, ओम प्रकाश, दिनेश सिंग या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध शेतकरी, पशुपालक, दूधसंकलन केंद्रांना भेट दिली. गणपती विसर्जनापर्यंत हे शेतकरी जिल्ह्यातील शेतीशी निगडित प्रकल्पांनाही भेट देणार आहेत. 

ओम प्रकाश म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जलसिंचनाच्या सुविधा आहेत; तसेच येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यातुलनेत आमच्याकडे अजून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आलेले नाही. आमच्याकडे कृषी संशोधन संस्थांचा अभाव आहे. येथील शेतकरी आणि तज्ज्ञांनी मदत केल्यास आमचा शेतकरीसुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढेल.’’ ‘आम्ही पुणेकर’चे हेमंत जाधव म्हणाले, ‘‘काश्‍मीरमधील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सुधार व्हावा, यासाठी या पहिल्याच अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यापुढेसुद्धा काश्‍मीरमधील शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्यासाठी पुण्यात आणणार आहे.’’ 

‘महाराष्ट्रात पिकणारी सोयाबीन, तीळ, कापूस यांसारख्या पिकांची लागवड आमच्याकडे होऊ शकते. थंडीचे दिवस वगळता इतर दिवसातील हवामान दोन्ही राज्यांत सारखे आहे. या पिकांचे उत्पादन घेतल्यामुळे काश्‍मीरमध्ये उत्पादनाचे नवीन स्रोत निर्माण होईल,’’ असे मत बलवंत सिंग यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmir Business Employment