काश्‍मिरी मुलींचा पुण्याकडे ओघ कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

तीन वर्षांमध्ये पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या काश्‍मिरी मुलींची संख्या नक्कीच कमी झाली आहे. अनेक जणी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र, नोकरीसाठी त्यांना परत जावे लागते. त्यांना पुण्यात रुळायला अडचणी येतात. ही संख्या घटण्याचे कारण म्हणजे इतर शहरांमध्येही जास्तीत जास्त संधी उपलब्ध झाल्या आहेत.
- संजय नहार, सरहद संस्था

शिक्षणासाठी अन्य शहरांना पसंती; सरकारच्या अनेक योजना पोचल्या जम्मू-काश्‍मीरपर्यंत 
पुणे - शैक्षणिक संस्था, नवे अभ्यासक्रम, नोकरीच्या विविध संधी यामुळे पुण्याला पसंती देणाऱ्या काश्‍मिरी मुलींनी यंदा मात्र पुण्याकडे पाठ फिरवली आहे. या मुलींनी पुण्याऐवजी औरंगाबाद, नाशिक आणि इतर शहरांमध्ये शिक्षण घेण्यास प्राध्यान्य दिले आहे. पुण्यामध्ये सुमारे ३५० काश्‍मिरी मुली शिक्षण घेत आहेत. पाच वर्षांपूर्वी ही संख्या सुमारे ७०० इतकी होती, ती सध्या निम्म्याने कमी झाली आहे.

पुण्यामध्ये शिक्षण घेताना तणावमुक्त आणि विश्‍वासू वातावरण असते. तसेच शिक्षणाबाबतच्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. मुख्य म्हणजे शिक्षणातील अनेक शाखांमध्ये संधी उपलब्ध आहेत. सरहद, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून काश्‍मीरमधील अनेक मुली पुण्यात शिक्षण घेण्यास प्राध्यान्य देत होत्या. काश्‍मीरमधील मुली या हुशार, करिअरला प्राधान्य देणाऱ्या आहेत. वैद्यकशास्त्र, व्यवस्थापन, अभियांत्रिकी शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अशा जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये त्या अग्रभागी आहेत. त्यासोबतच बॅंक आणि सरकारी नोकरीला जास्त पसंती देतात. इतरांप्रमाणेच तेथील मुलींना नोकरी असल्याशिवाय लग्न ठरण्यासाठी अडचणी येतात.

त्यामुळे शिक्षणाला महत्त्व दिले जाते. सरकारच्या अनेक योजनांमुळे त्या इतर शहरातही पोचल्या आहेत. पुण्यासह इतर शहरांमध्ये शैक्षणिक व्यासपीठ निर्माण झाल्याने या मुली राज्यभर जात आहेत. त्यासोबतच अनेक योजना जम्मू-काश्‍मीरपर्यंत पोचल्याने अनेक जणी तेथेही शिक्षण घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmir Girl Pune Education