पुणेकरांनो, काश्‍मीर तुमची वाट पाहतोय!

Kashmir
Kashmir

पुणे - उत्तुंग हिमशिखरे, प्रदूषकांचा लवलेश नसलेली शुद्ध मोकळी हवा, नैसर्गिक स्रोतांमधून खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि मनाला भुरळ घालणारी सदाहरित जंगले तुम्हाला साद घालत आहेत. भूलोकांवरील स्वर्ग मानला जाणारा काश्‍मीर तुम्हाला बोलावत आहे. तुमच्या स्वागतासाठी प्रत्येक काश्‍मिरी नागरिक वाट पाहतोय. तुम्ही नक्की या... असे निमंत्रण काश्‍मीरच्या पर्यटन विभागाने पुणेकरांना बुधवारी दिले.

काश्‍मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्रातून जातो. त्यातही पुण्या-मुंबईच्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक. त्यामुळे लवकरच सुरू होत असलेल्या पर्यटन हंगामात पुणेकरांनी काश्‍मीरला प्राधान्य द्यावे, हे खास सांगण्यासाठी काश्‍मीर पर्यटन विभागाचे संचालक निसार ए. वाणी पुण्यात आले होते. त्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या टूर ऑपरेटर्सची परिषद आयोजित केली होती. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना वाणी यांनी आवाहन केले. 

पुलवामा हल्ल्यानंतर काश्‍मीरमधील पर्यटनाकडे बघण्याची पर्यटकांची दृष्टी बदलत आहे. पण, काश्‍मीर देशातील इतर राज्यांइतकाच सुरक्षित आहे. तुम्ही कोणतीही शंका, भीती मनात घेऊन येऊ नका. तुम्ही तेथे या आणि काश्‍मीरच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्या. हे सौंदर्य आपल्या मनात साठवा, डोळ्यांत भरून घ्या आणि कॅमेऱ्यात बंद करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काश्‍मीरमधील प्रत्येक पर्यटक सुरक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून काश्‍मीरमधील पर्यटकांची संख्या वाढत आहे. जम्मू, काश्‍मीर खोरे तसेच कारगिल, लेह, लडाखला देशातील आणि परदेशातील पर्यटक प्राधान्य देत आहेत. पण, पुलवामासारख्या घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ नये. तेथील पर्यटन सुरक्षित असल्याचा संदेश देण्यासाठी आम्ही पुण्यात आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू ॲण्ड काश्‍मीर टुरिझम आणि ट्रॅव्हल एजंट्‌स सोसायटी ऑफ काश्‍मीरतर्फे (टीएएसके) आयोजित परिषदेत हाउसबोट मालक, हॉटेल व्यावसायिक आणि ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रातील व्यावसायिक यांचा समावेश होता. पुण्याच्या ‘ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर, ‘टीएएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष बेहराम पी. झादेह, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, काश्‍मीर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शेख आशिक, काश्‍मीर ट्रॅव्हल एजंट्‌स सोसायटीचे अध्यक्ष मीर अन्वर, सिल्क रूट हॉलिडेजचे व्यवस्थापकीय संचालक मंजूर पख्तून, ऑफ बीट डेस्टिनेशन्सचे संचालक नितीन शास्त्री, लक्‍झरी हॉलिडेज,ॲडव्हेंचर ट्रॅव्हल ॲण्ड डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नासीर शाह, काश्‍मीर हॉटेल्स ॲण्ड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशनचे (खारोफ) संचालक वाहिद मलिक, काश्‍मीर फ्रेंड्‌स ट्रॅव्हलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हमीद वांगो आणि ऑल कारगिल ट्रॅव्हल ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष अश्रफ अली उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com