"गाश' बॅंडद्वारे काश्मिरी तरुण देणार शांतीचा संदेश
पुणे - बॉंबहल्ले, बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज आणि हिंसाचारानं त्यांचं बालपण करपलं; पण त्यांच्यामधील विवेकाचा प्रकाश जागा होता... तो उजळला. हिंसेला उत्तर हिंसा नाहीच, "गन'ला उत्तर गन नव्हे; तर गिटार आहे, अशी भावना घेऊन त्यांचे हात रेंगाळले ते संगीतातील स्वरांवर. त्याची गाज आता "गाश' या बॅंडद्वारे शांतीचा संदेश देशभर जाऊ पाहत आहेत!
पुणे - बॉंबहल्ले, बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज आणि हिंसाचारानं त्यांचं बालपण करपलं; पण त्यांच्यामधील विवेकाचा प्रकाश जागा होता... तो उजळला. हिंसेला उत्तर हिंसा नाहीच, "गन'ला उत्तर गन नव्हे; तर गिटार आहे, अशी भावना घेऊन त्यांचे हात रेंगाळले ते संगीतातील स्वरांवर. त्याची गाज आता "गाश' या बॅंडद्वारे शांतीचा संदेश देशभर जाऊ पाहत आहेत!
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराने होरपळलेल्या तसेच हल्ल्यांमध्ये कुटुंब गमावलेल्या अनाथ युवकांनी पुण्यात आणि उर्वरित भारतात घेतलेल्या शांततेच्या आणि प्रेमाच्या अनुभवातून "गाश' (प्रकाश) नावाचा बॅंड तयार केला आहे. हिंसाचार हीच ओळख असलेल्या या नंदनवनाची वेगळी ओळख हे तरुण संगीतमय मार्गाने लोकांना करून देणार आहेत. हे सर्व तरुण सरहद संस्थेतील आहेत. या बॅंडमुळे जम्मू-काश्मीरच्या युवकांच्या देशाशी असलेल्या नात्याबाबत आशावादी चित्र तयार होईल, अशी त्यांची भावना आहे.
या पथकातील मंझूर म्हणतो, ""पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या माझ्या वडिलांनी मला वाचवण्यासाठी बंदूक उचलली; परंतु दहशतवाद्यांनी त्यांना मी त्यांच्या मांडीवर असताना ठार केले. मी मात्र जगलो.''
""दहशतवाद्यांनी माझ्या गावात केलेल्या हल्ल्यामध्ये माझी आई, वडील, बहीण आजोबांसह कुटुंबातील पंधरा लोकांना ठार मारले; तर पाच जण गंभीर जखमी झाले. तेव्हा मी केवळ चार वर्षांचा होतो. माझ्या बहिणीने मला शेतात फेकून दिले म्हणून मी वाचलो,'' अशी शहारा आणणारी आठवण दोडा जिल्ह्यातून आलेला जोगिंदरसिंग सांगतो.
बांदीपूर जिल्ह्यातील आकीब भट्ट, कारगीलमधील बशीर खान, आरागामची रुकया मखबूर, मुख्तार डार यांनीदेखील त्यांच्यासंबंधी घडलेल्या हिंसाचाराचे अनुभव सांगितले. "आम्ही त्या वाटेने नाही, तर शांतीने देश जोडण्याच्या मार्गाने जात आहोत,' अशी ग्वाही या सर्वांनी दिली.
""बसच्या आसनाखाली लपलेल्या दहशतवाद्यांनी माझ्या काकूला गोळ्या घालून ठार केले. माझी आई गंभीर जखमी झाली, रक्ताळलेल्या अवस्थेत आईने मला वाचवले. या वेदना आहेतच; पण त्याला उत्तर हिंसा नाही, तर शांती आहे. ती संगीतातूनच साध्य होईल.
- शामिमा अख्तर, "गाश' या बॅंडचा मुख्य चेहरा
पहिले सादरीकरण आज पुण्यात
काश्मिरी तरुण त्यांच्या कलेचे पहिले सादरीकरण मंगळवारी (ता. 8) पुण्यात करणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघात रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. काश्मिरी सूफी संगीत आणि हिंदी, मराठी गीतेही ते सादर करतील. याबद्दल "सरहद'चे शैलेश वाडेकर आणि जाहिद भट म्हणाले, ""धुमसणाऱ्या जम्मू काश्मीर खोऱ्याची प्राचीन संगीत आणि काव्याची परंपरा ते सांगतील. यातून काश्मीरबद्दलच्या लोकांच्या मनातील नकारात्मक प्रतिमेमध्ये बदल होण्यास मदतच होईल. देशभरातील महाविद्यालयांसह विविध ठिकाणी हे कार्यक्रम करण्याचा मानस आहे.''