कातकरी पाड्यांनी अनुभवला प्रकाशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

स्थानिक रहिवासी गणपत कोळी म्हणाले, ""आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी झाली. फराळाच्या अनेक पदार्थांची नावेदेखील माहीत नव्हती. पुणेकरांनी आमच्यासोबत दिवाळी साजरा करून वस्तीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.''

पुणे - डोंगरावर वसलेली कातकरी समाजाची वस्ती...आधुनिक जीवनापासून खूप लांब असलेली...वीज तर सोडाच; पण मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचाही प्रकाश नाही...दिवाळी लांबच...प्रकाशाचा सण तर त्यांना माहीत असला, तरी नशिबामुळे तो साजरी करण्याची कुवत नाही...अशाच लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अन्‌ दिवाळीचे क्षण गुंफण्याचे काम पुण्यातील तरुणाईने केले. आकाशकंदील अन्‌ फराळ पाहून वस्तीतल्या लहानग्यांचे चेहरे फुलतानाच त्यांची वस्ती प्रकाशाने उजळून निघाली. त्यांनी तरुणाईला "खूप छान', अशी प्रतिक्रिया देत दिवाळीचा रंग अनुभवला.

दिवाळीचा फराळ आणि फटाक्‍यांची आतषबाजी यापासून वंचित असलेली कातकरी समाजाची वस्ती तरुणाईने दिलेल्या आकाशकंदील, फराळ, फटाके आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. फराळ, आकाशकंदील अन्‌ असा वेगळा आनंद नकळत आयुष्यात आल्यावर या कातकरी पाड्यांवरील लोकांचे चेहरे आनंदोत्सवात न्हाऊन गेले.

पुण्यापासून हाकेच्या अंतरावरील पौडमध्ये राहणाऱ्या कातकरी समाजासाठी तेथील कलमशेत, अंधेसे आणि बेलवडे येथील कातकरी पाड्यांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके आणि फराळ पाहून लहानगे उत्साहित झाले अन्‌ आनंदाच्या प्रकाशपर्वात फुलभाज्या आणि फटाक्‍यांची आतषबाजी त्यांनी केली. मुलांमध्ये दिवाळीचे एक वेगळेच समाधान होते आणि त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
कसबा पेठेतील त्रिमूर्ती मित्रमंडळ, प्रभात प्रतिष्ठान, गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी किरण सोनिवाल, डॉ. विजय पोटफोडे, सुशील अगज्ञान, पीयूष शहा, विनय चाळणीवाले, राजेंद्र भोसले, प्रतीक निंबाळकर, विकास महामुनी आदी उपस्थित होते.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी दिवाळी फराळ, उटणे, पुस्तके, पणत्या आणि कपडे देऊन कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक घराच्या दरवाजामध्ये आकाशकंदील लावून दिवाळीचे महत्त्व सांगितले. चिमुकल्यांनी फटाके उडविण्यासोबतच फराळाचा आस्वाद घेतला.
 

Web Title: katkari community celebrates special diwali