कात्रजचा बायोगॅस प्रकल्प बंदच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

कात्रज - शहरात आदर्श ठरलेला कात्रज येथील पथदर्शी बायोगॅस प्रकल्प तब्बल दीड वर्ष बंद ठेवून महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाची चेष्टा केली असल्याचा आरोप करत निविदा प्रक्रियेनंतर कार्यादेश मिळूनही कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवशंभू प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला.

सलग चार वर्षे वॉर्डातला कचरा वॉर्डातच जिरवण्यात या बायोगॅस प्रकल्पाने प्रमुख भूमिका बजावली होती. हा पथदर्शी प्रकल्प शहरात सतरा ठिकाणी राबविण्यात आला होता. दररोज पाच टन ओल्या कचऱ्याचा बॉयोगॅस तयार होऊन त्यातून वीजनिर्मिती होत होती. निर्माण होणारी वीज आजी-आजोबा उद्यानासह उड्डाण पुलाच्या दिव्यांना प्रकाशमान करतानाच फुलराणीही त्या विजेवर धावत होती. प्रकल्प दीड वर्ष बंद ठेवल्यामुळे तीन हजार टन ओला कचरा इतर प्रकल्पांना देण्यात आला. 

प्रकल्प सुरू करण्यासाठी नागरिकांनी पाठपुरावा केला. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल, हे एकमेव उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी बोळवण केली गेली. अखेर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.   

नगरसेविका मनीषा कदम म्हणाल्या, ‘‘प्रकल्प सुरू व्हावा म्हणून आयुक्तांसह घनकचरा उपायुक्तांकडे पत्र व्यवहार केला आहे. कार्यादेश मिळाल्यामुळे प्रकल्प लवकरच सुरू होईल.’’

‘‘प्रकल्प सुरू करण्यासाठीचा कार्यादेश मिळाला आहे. प्रकल्पाची दुरुस्ती करून तो सुरू करण्याची सूचना ठेकेदाराला दिली आहे,’’ असे अभियंता सुधीर चव्हाण यांनी सांगितले.

वर्षभर महापालिकेने टोलवाटोलवीची उत्तरे दिली आहेत. स्थायी समितीची मान्यता मिळायला वर्षभराचा कालावधी लागत असेल, तर कचरा या विषयाशी पालिका अजिबात गंभीर नाही. नागरिकांच्या पैशातून उभारलेला प्रकल्प बंद ठेवून मोठे नुकसान केले आहे.
- महेश कदम,  अध्यक्ष, शिवशंभू प्रतिष्ठान

Web Title: Katraj biogas project will be closed