बकाल चौक कधी सुधारणार ? 

अनिल सावळे 
मंगळवार, 14 मार्च 2017

पुणे -  कात्रज चौक आणि खडी मशिन चौकातून शहरात येताना नजरेस पडणारी अस्ताव्यस्त वाहतूक... बेशिस्त वाहनचालक... रस्त्यालगत अतिक्रमण... खासगी जागांचे हस्तांतर करण्यास महापालिकेकडून विलंब... महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव... अशा विविध कारणांमुळे दोन्ही चौक बकाल झाले आहेत. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळ न दवडता या चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

पुणे -  कात्रज चौक आणि खडी मशिन चौकातून शहरात येताना नजरेस पडणारी अस्ताव्यस्त वाहतूक... बेशिस्त वाहनचालक... रस्त्यालगत अतिक्रमण... खासगी जागांचे हस्तांतर करण्यास महापालिकेकडून विलंब... महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव... अशा विविध कारणांमुळे दोन्ही चौक बकाल झाले आहेत. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळ न दवडता या चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

कात्रज चौक 
कात्रज चौकात जुना पीएमपी बसथांबा, बीआरटी बस स्थानक, सावंत कॉर्नरजवळ आणि जुन्या जकात नाक्‍यासमोर लांबपल्ल्याच्या बसेससाठी बसथांबा असे एकूण चार बसथांबे आहेत. याशिवाय सात ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने चौकालगतच थांबलेली असतात. कात्रजच्या मुख्य चौकात दीडशे मीटरच्या अंतरावरच चक्‍क दोन ठिकाणी सिग्नल आहेत. कात्रज- कोंढवा बाह्यवळण, कात्रज- देहूरस्ता बाह्यवळण आणि पुणे- बंगळूर हा जुना राष्ट्रीय महामार्ग हे कात्रज चौकात एकत्रित येतात, त्यामुळे अवजड वाहने आणि अन्य वाहनांच्या वर्दळीमुळे चौकात कोंडीच्या समस्या भेडसावत आहेत. हा चौक पूर्वी पालिकेच्या दोन प्रभागांच्या हद्दीत विभागला होता, त्यामुळे चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण कोण करणार, याबाबत दुमत होते. पण, आता हा चौक एकाच प्रभागात गेला आहे, त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून हा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. 

कात्रज चौकातील समस्या - 
- एकाच चौकात चार बसथांबे अन्‌ सात रिक्षाथांबे 
- बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने 
- चौकांमध्ये पथारी, भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून अतिक्रमण 

उपाययोजना - 
- कात्रज बीआरटी मार्ग गुजरवाडी महापालिका हद्दीपर्यंत नेणे आवश्‍यक 
- कात्रज तलावालगत पीएमपीएलची आरक्षित जागा, त्याच ठिकाणी बस स्थानक होणे अपेक्षित 
- एसटी महामंडळाची अडीच एकर जागा आहे, तेथे लांबपल्ल्याच्या बसेससाठी बस स्थानक व्हावे 
- ग्रेडसेपरेटर उभारल्यास वाहतूक सुरळीत होणे शक्‍य 
- जुन्या पीएमपी बसथांब्याजवळ उड्डाण पूल थेट चौकात जोडल्यास वाहतूक सुरळीत 
(महापालिकेने खासगी जागा हस्तांतरित करून घेतल्यास शक्‍य) 

खडी मशिन चौक 
कात्रज आणि कोंढव्यातून येवलेवाडी, उंड्री- पिसोळीकडे जाताना लागणारा खडी मशिन चौक. या परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. खडी मशिन चौक ते उंड्री- पिसोळी या मार्गावर अवजड वाहनांसोबतच दुचाकी आणि मोटारींच्या संख्येत वाढ झालेली आहे. मुंबईकडून येणारी अवजड वाहने दिवे घाटमार्गे सासवड, जेजुरीकडे जातात. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतीमालाची वाहतूक बोपदेव घाटमार्गे खडी मशिन चौकातून मार्केट यार्ड येथे होते. या परिसरात अभियांत्रिकीसह चार महाविद्यालये आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. कात्रज, पिसोळी आणि येवलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकातच अनधिकृत रिक्षा थांबतात. खडी मशिन चौक ते पिसोळी रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तर, रस्त्याची दुसरी बाजू पूर्णपणे उखडलेली आहे. खडी मशिन चौकात वाहतूक कोंडीची समस्या वाढल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या चौकाच्या रुंदीकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. 

खडी मशिन चौक समस्या 
- अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूस वाहने
- रस्त्यावर भरचौकातच अनधिकृत रिक्षा थांबे 
- सिग्नल असूनही अनेक महिन्यांपासून बंदच 
- चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण रखडलेले 
- पोलिसांकडून वाहतूक नियमनापेक्षा "वसुली'वर भर 
- स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

उपाययोजना - 
- चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाची गरज 
- सिग्नल पूर्ववत सुरू करणे गरजेचे 
- वाहतूक नियमनावर लक्ष देणे अपेक्षित 
- वाहन बंद पडल्यास क्रेनची उपलब्धता हवी 
- चौकातील अतिक्रमण हटविण्याची गरज 
- आमदार आणि नगरसेवकांनी लक्ष दिल्यास काम तडीला

Web Title: katraj chowk traffic issue