कात्रज घाटाची वाट बिकट

कात्रज घाटाची वाट बिकट

खेड शिवापूर - पावसाळ्यापूर्वी घाट रस्त्यालगतच्या चरांची न केलेली साफसफाई, डोंगरावर कोसळण्याच्या अवस्थेत असलेली झाडे आणि घाट रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेला राडारोडा, यामुळे कात्रज घाट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग कात्रज घाट रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे काणाडोळा करीत आहे.

कात्रज जुन्या घाट रस्त्यालगतच्या चरांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करणे गरजेचे होते. मात्र, अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने या चरांची साफसफाई केलेली नाही. येथील चरात मोठ्या प्रमाणात राडारोडा साचला असून, गवत उगवले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन खड्डे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जुन्या बोगद्याजवळील वळणावर मागील वर्षी पडलेला दरडीचा राडारोडा अद्याप चरात पडून आहे. तो हटविण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही.

घाट रस्त्यालगतच्या डोंगरावरील अनेक झाडांची माती निसटली असून, ही झाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तर, संपूर्ण घाट रस्त्यात ठिकठिकाणी बांधकामाचा राडारोडा आणि कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे घाट रस्त्याची अवस्था बकाल झाली  आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com