कात्रज-कोंढवा रस्ता बनला जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक, भरधाव वाहने, तीव्र उतार आणि खराब रस्ता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघातांचे दुष्टचक्र सुरूच आहे. मागील आठवडाभरात या रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात चौघांना जीव गमवावा लागला. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सहा महिन्यांनंतरही संथगतीने सुरू असून, अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पुणे - मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक, भरधाव वाहने, तीव्र उतार आणि खराब रस्ता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघातांचे दुष्टचक्र सुरूच आहे. मागील आठवडाभरात या रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात चौघांना जीव गमवावा लागला. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सहा महिन्यांनंतरही संथगतीने सुरू असून, अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पुणे बंगळूर मार्गावरून सोलापूर रस्ता, नगर रस्त्याकडे जाण्यासाठी आणि नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावरून कात्रजला येण्यासाठी कात्रज-कोंढवा हा बाह्यवळण मार्ग वाहनचालकांसाठी सोईस्कर ठरतो. विशेषतः अवजड वाहनांना शहरातून जाण्यास बंदी असल्यामुळे अवजड वाहने या रस्त्याचा वापर करून शहराच्या दुसऱ्या भागात जाण्यास प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत नागकरीकरण झपाट्याने वाढल्याने या रस्त्यावर छोट्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

मागील आठवडाभरात या रस्त्यावर चार अपघात झाले. याच चार जण ठार झाले. याच पद्धतीने दर महिन्याला किमान दहा ते पंधरा जणांना आपला जीव गमावावा लागत आहे. खडी मशिन चौक व उंड्री चौकादरम्यान मागील साडेतीन वर्षात शंभरहून अधिक जणांना जीव गमावावा लागला आहे. 

अपघातांची कारणे
    रस्तारुंदीकरणाचे संथ गतीने सुरू असलेले काम
    अवजड वाहनांची संख्या वाढली, रस्ता मात्र अरुंद 
    मार्गावर सेवा रस्त्यांचा अभाव
    तीव्र उतारामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटणे 
    अरुंद रस्ते, खड्डे व खोदाईमुळे अपघात वाढले

अपघाताची ठिकाणे 
कात्रज चौक, शत्रुंजय मंदिर, इस्कॉन मंदिर, खडी मशिन चौक, उंड्री चौक, पिसोळी चौक, मंतरवाडी चौक, हांडेवाडी चौक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katraj-kondhwa road becomes dangerous