कात्रज वाहनतळ रखडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - वाहनचालकांच्या सोयीसाठी कात्रज येथील वसंतदादा पाटील बस स्थानकाच्या (पीएमपी) छतावर सव्वाशेहून अधिक वाहनांसाठी उभारलेले वाहनतळ आठ वर्षांपासून पडून आहे. बसस्थानक आणि वाहनतळ ‘बीआरटी’च्या प्रवाशांसाठी नियोजित असल्याने त्याचा वापर करीत नसल्याचे ‘पीएमपी’कडून सांगण्यात येते. मुळात वाहनतळाचे कामच अपूर्ण राहिल्याने वापर करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

पुणे-सातारा रस्त्यावर राबविण्यात आलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील ‘बीआरटी’ सेवेसाठी कात्रज, राजीव गांधी उद्यान आणि स्वारगेट येथे राजर्षी शाहू महाराज बसस्थानक उभारण्यात आले. विशेषत: उपनगरे आणि जिल्ह्यांतून वाहने घेऊन येणाऱ्या प्रवाशांसाठी या स्थानकांच्या छतावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ (फिडर रुट स्टॅण्ड) उभारण्यात आली. उपनगरांतून येणाऱ्या प्रवाशांना आपली खासगी वाहने वाहनतळावर उभी करून बसमधून प्रवास करणे शक्‍य होईल, असा वाहनतळ उभारण्याचा उद्देश होता. मात्र, २००८ पासून कात्रज येथील पाटील वाहतनळ खुले करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने वाहनतळ सुरू करण्याची मागणी करूनही ते सुरू केले जात नाही. वाहनतळाचे काम करताना वाहने आणि चालकांच्या सोयीसाठी सुविधा केल्या नसल्यानेच ते वापराविना पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्थानकाच्या छतावर साधारणत: १२० दुचाकी आणि ३० मोटारींची (कार) व्यवस्था आहे. या रस्त्यावरील ‘बीआरटी’ सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था आहे. मात्र, ‘बीआरटी’ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वाहनतळ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच त्याचा वापर होत नाही. मात्र, येथील खासगी वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन वाहनतळ सुरू करण्याच्या हालचाली आहेत, असे ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘शहरालगतच्या उपनगरांमधील वाहनांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. अशा परिस्थितीत कात्रज येथील वाहनतळ बंद ठेवणे योग्य नाही. वाहनचालकांना चांगली सेवा देऊन ते सुरू करावे, याबाबत ‘बीआरटी’ आणि ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना केल्या जातील.’’ 

Web Title: Katraj Parking issue