पु. ल. देशपांडेंची रेल्वे इंजिनातली गंमतजंमत (व्हिडिओ)

पु. ल. देशपांडेंची रेल्वे इंजिनातली गंमतजंमत (व्हिडिओ)

पुणे - मराठीतले थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी रेल्वे इंजिनात बसून केलेल्या प्रवासाची धमाल काही वेगळीच आहे. पुलं आजोबांच्या मनात कसं एक छोटं, निरागस मूल दडलं होतं याबद्दलचा हा किस्सा . कात्रज फुलराणीतल्या सफरीनिमित्तानं तो लक्षात घेऊया. 

कात्रज तलाव परिसरातील 'फुलराणी' या चिमुकल्या रेल्वेगाडीत उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त येणाऱ्या मुलं आणि पालकांची गर्दी सध्या असते. चार छोट्या डब्यांच्या या टुमदार गाडीतून प्रवास करताना मुलांची अखंड किलबिल ऐकायला मिळते.  अशाच एका प्रवासात 'सकाळ'च्या प्रतिनिधीनं रेल्वे इंजिनातून प्रवास करून पुलंच्या 'त्या' विलक्षण प्रवासाच्या आठवणी जागवल्या. 

पुणे आकाशवाणीवर त्यांच्या संग्रहातील पुलंचं एक भाषण अधूनमधून ऐकवलं जातं. त्याचं शीर्षक आहे 'राहून गेलेल्या गोष्टी.' यात पुलंनी अशी हकिगत सांगितली आहे की, कुठल्याश्या छोट्या गावात ते पाहुणे म्हणून गेले होते.  जवळच्या रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पहात थांबले असताना तिथल्या स्टेशन मास्तरांनी त्यांना पाहिलं. मी तुमच्यासाठी काय करू म्हणून विचारलं. पुलंच्या मनातली  राहून गेलेली एक इच्छा गप्पांच्या ओघात त्यांना समजली. पुलं ज्या गाडीनं पुढं जाणार, तिला वेळ होता. तोवर दुसरी गाडी आली. स्टेशन मास्तरांनी इंजिन ड्रायव्हरला सांगितलं की, हे साहेब मराठीतले मोठे लेखक आहेत. यांना पुढच्या स्टेशनपर्यंत इंजिनमधून प्रवास घडवा. नंतर ते पुन्हा इथं येऊन ठरल्याप्रमाणे त्यांच्या गाडीनं जातील. 

इंजिन ड्रायव्हरनं पुलंना सन्मानानं इंजिनात बसवलं. तुमची आणखी कुठली इच्छा मी पुरी करू शकतो, असं विचारल्यावर पुलंनी हॉर्न वाजवायचं मनात असल्याचं सांगितलं. ड्रायव्हरनं तशी परवानगी दिल्यावर पुलंनी मनसोक्त हॉर्न वाजवला.  त्यांनीच रंगवून सांगितलेला हा किस्सा त्यांच्या भाषणातून आवर्जून ऐकायला हवा, असा आहे. सकाळच्या बालवाचकांसाठी प्रतिनिधीनं व्हिडिओच्या माध्यमातून तो या सदरा अंतर्गत सांगितला आहे. त्याला फुलराणीतील प्रवासाची, सभोवतालच्या निसर्गदृश्यांची जोड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com