कात्रज घाटातील धबधब्याची सलामी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

पुणे : गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे कात्रज घाटातील जुना बोगदा परिसरात कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. शनिवार, रविवारची सुटी साधून शहरासह उपनगरातील अनेक जण या धबधब्याकडे येताच दिवसभर वाहतूक मंदावली होती. 

पुणे : गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे कात्रज घाटातील जुना बोगदा परिसरात कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. शनिवार, रविवारची सुटी साधून शहरासह उपनगरातील अनेक जण या धबधब्याकडे येताच दिवसभर वाहतूक मंदावली होती. 

धोकादायक वळणावरील अपघात टाळण्यासाठी या धबधबा परिसरात जास्त वेळ वाहने थांबवून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगीतले आहे. 

पावसाळ्यात कात्रज जुन्या घाटातील धबधबा कोसळण्याची प्रतीक्षा अनेकांना असते. संततधार पाऊस होताच हा धबधबा दरवर्षी कोसळतो. या वर्षी पहिली सलामी या धबधब्याने दिली आहे. कात्रज घाटातील जुन्या बोगद्याकडे जाताना अखेरच्या वळणावर हा धबधबा उगम पावतो. पुण्याकडे येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहने या वळावर थांबतात. अत्यंत धोकादायक वळणावर अनेक वाहने एकाचवेळी थांबल्यामुळे शनिवारी आणि रविवारी दिवसभर वाहतूक खोळंबली होती. शनिवारी काही हुल्लडबाजांनी मोटारीतील टेपरेकॉर्डर लावून तासभर धिंगाना केला होता. उत्सुकतेपोटी अनेक जणांनी थांबून धबधब्याचा कडा सर केला, तर काही जणांनी मनसोक्त 
भिजण्याचा आनंद घेतला. तब्बल शंभर फूट उंचावरून धबधबा घाट रस्त्याच्या खालून दरीत कोसळतो. धबधबा ज्या खड्ड्यात कोसळतो त्याही खड्ड्यात उतरण्याचा प्रयत्न अनेक जण करत होते. निसर्गाचा अविष्कार पाहताना अतिउत्साहाच्या भरात केलेल्या करामती जीवावर बेतणार नाहीत, याची खबरदारी घेताना तरुणाई दिसत नाही. विविध अँगलने सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. धबधबा कोसळत असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देणे आवश्‍यक असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. 

शहराकडे येताना तीव्र उतारावरील पहिल्या धोकादायक वळणावर हा बोगदा आहे. जेथे बोगदा कोसळतो तेथील मार्गालगत जागा अपुरी आहे. धबधबा पाहण्यासाठी प्रत्येक वाहनाचा वेग कमी होतो. बहुतांशी जण थांबून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु वाहने उभी करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेत नाहीत. 
दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात आणि अनेकदा वाहतूक कोंडी होते. धबधबा परिसरात शंभर मीटर अंतरात वाहने थांबवण्यास प्रतिबंध होणे अपेक्षित आहे. स्थानिक पोलिसांची गस्त आणि वाहतूक पोलिसांचे नियोजन आवश्‍यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Katraj waterfall begins