कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी : जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष देत नाही, तालुका वैद्यकीय अधिकारी भेट देत नाही, त्याबरोबरच दोन वैद्यकीय अधिकारी असताना आरोग्य तपासणी होत नाही, कर्मचारी देखील मनमानी करत असल्याची तक्रार वृद्धांनी केल्यावर कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. अचानक ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

टाकळी हाजी : जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष देत नाही, तालुका वैद्यकीय अधिकारी भेट देत नाही, त्याबरोबरच दोन वैद्यकीय अधिकारी असताना आरोग्य तपासणी होत नाही, कर्मचारी देखील मनमानी करत असल्याची तक्रार वृद्धांनी केल्यावर कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. अचानक ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गेल्या वर्षी येथून जवळच असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये एपिडेमिक टायफस या आजाराचे रूग्ण सापडले होते. त्यामुळे पावसाळ्यात या भागात वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवताना दिसतात. यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या परिसरात आरोग्य विभाग कार्यरत करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून या परिसरातील रूग्णांना आरोग्याची सुविधा मिळावी, यासाठी येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी निधी मंजूर करून दिला. त्यातून येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना निवासाची सोय झाली.

सभागृह तयार करून येथे आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत येथे परिसरातील कुपोषित बालके व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देतात. पण कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठवड्यापासून वैद्यकीय अधिकारी येत नसल्याने रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा तक्रारी करून देखील येथील वृद्धांना कर्मचारी अरेरावीची भाषा करत असतात. येथील वैद्यकीय परिचारिका सलाईन न काढता तेथील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना दिसतात. 

वेळेत कधीच हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होत नाही, अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असताना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मनमानी करत एक वर्षापासून एका वैद्यकीय अधिकाऱ्याची तोंडी नियुक्ती केंदूर येथे केली आहे. आरोग्य अधिकाऱ्याचा हा मनमानी कारभार गेल्यावर्षी झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांना सांगितला होता.

मात्र. त्यावर देखील याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. आरोग्य खात्याचा हा मनमानी कारभार सध्या वृद्धांच्या आरोग्याचा विषय बनत चालला आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी या आरोग्य केंद्राला टाळा ठोकला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सरपंच दिपक रत्नपारखी, अरूण मुंजाळ, बाजीराव उघडे, मोहन पडवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

शेतमालाला बाजारभाव नाही, त्यात पाऊस देखील कमी झाला आहे. या ढगाळ हवामानाने कधी कंबर दुखते तर कधी ताप येतो. पैसे नसल्याने सरकारी दवाखाना बरा पडतो. पण डॅाक्टर पण नाय अन् ही लोकही नीट सांगत नाय. आम्ही म्हाताऱ्या माणसांनी जायाचं कुठं असचं झालया. अशी काहीशी दीनवाणी प्रतिक्रिया येथे आलेल्या वृद्ध रूग्णांनी दिली.

Web Title: Kavate Yemeni Primary Health Center Closed