कवितेच्या पानाला "वेबसीरिज'चं कोंदण !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - एरवी हौसेपोटी कविता करणं, कधी तरी आवडीनं कवितांची पुस्तकं वाचणं आणि खूपच आवड असली, तर कवितांच्या कार्यक्रमाला जाणं,

पुणे - एरवी हौसेपोटी कविता करणं, कधी तरी आवडीनं कवितांची पुस्तकं वाचणं आणि खूपच आवड असली, तर कवितांच्या कार्यक्रमाला जाणं,
असं आपल्यातले अनेक जण करत असतीलच. कित्येक जण त्याही पुढे जात कवितांचे ब्लॉग्सदेखील फॉलो करत असतील; पण शुक्रवारची संध्याकाळ मात्र यापेक्षा वेगळी होती. कारण, एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात आणि "वेबसीरिज' नामक एका देखण्या ऑनलाइन कोंदणात हे "कवितेचं पान' रसिकांपुढे अलगदपणे उलगडत चाललं होतं...

होय, "कवितेचं पान' हे नाव आहे एका वेबसीरिजचं. संपूर्णतः कविता आणि कवितांनाच वाहिलेल्या या एका आधुनिक अन्‌ ऑनलाइन व्यासपीठाच्या उद्‌घाटनाचा सोहळा रसिकांनी तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाने अनुभवला.

आता कवितांचाच अनुभव तो, त्याविषयी काय बोलावं!... कधी खळखळून हसायला लावणाऱ्या, कधी डोळ्यांत चटकन पाणी आणणाऱ्या, कधी दुसऱ्याच कुठल्या जगाच्या सफरीवर नेणाऱ्या, तर कधी त्या शब्दाशब्दांना दाद घेऊन जाणाऱ्या अशा अनेक कविता पाहतापाहता मंचावर साभिनय सादर होत गेल्या अन्‌ रसिक त्यात अलगद गुरफटत गेले...

या देखण्या सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची विशेष उपस्थिती होती. शिवाय, शर्वरी जमेनिस, कौशल इनामदार, संदीप खरे, वैभव जोशी, कार्यक्रमाच्या संकल्पक मधुराणी गोखले प्रभुलकर हे कलाधर्मीदेखील उपस्थित होते. मिरॅकल्स ऍकॅडमी ऑफ आर्टस अँड मीडियातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.

अरे खोप्यामधी खोपा...
"अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला... देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' अशा अनेक कवितांचा एक झराच मग या ठिकाणी जणू वाहू लागला. ओळखीच्या, अनोळखी, माहितीतल्या, अनवट, फेसबुक-व्हॉट्‌सऍपवरच्या आणि अजूनही किती तरी कविता!... खुद्द नटसम्राट डॉ. लागू यांनीही बा. सी. मर्ढेकर आणि इंदिरा संत यांच्या कविता सादर करत रसिकांना उल्हासित केलं आणि यावर कळस चढवला.

Web Title: kavitecha pan