पुणे जिल्हा रुग्णालयास 'कायाकल्प' पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

राज्यात द्वितीय क्रमांक, नाशिकचे रुग्णालय पहिले
अकलूज - राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय "कायाकल्प' पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यात 2015-16 या वर्षासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने 50 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा, तर पुणे जिल्हा रुग्णालयाने 20 लाख रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.

राज्यात द्वितीय क्रमांक, नाशिकचे रुग्णालय पहिले
अकलूज - राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय "कायाकल्प' पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यात 2015-16 या वर्षासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने 50 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा, तर पुणे जिल्हा रुग्णालयाने 20 लाख रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.

महात्मा गांधींच्या जयंती दिवशी दोन ऑक्‍टोबर 2014 रोजी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली. सरकारी रुग्णालयांतील सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी या अभियानांतर्गत "कायाकल्प' पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये अशा गटांत ही स्पर्धा होत आहे. रुग्णालय आवार व आतील भागातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बिछान्यांची स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडिकलसह घन व द्रवरूप कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी बाबींचा विचार करून या पुरस्कारासाठी रुग्णालयांची निवड केली जाते. या विभागात वर्धा, नागपूर आणि नंदुरबार या जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत.

उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व महिला रुग्णालय विभागात गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा येथील उपरुग्णालयाने 15 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सस्तूर येथील ग्रामीण रुग्णालयाने 10 लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार मिळवला आहे. या विभागात 14 उपरुग्णालये, आठ ग्रामीण रुग्णालये व एक महिला रुग्णालय, अशा 24 रुग्णालयांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत.

घोडेगाव आणि मंचर रुग्णालयाचाही समावेश
उपजिल्हा रुग्णालये : अकलूज (सोलापूर), कालवण (नाशिक), केज (बीड), शिरोदा व दोडामार्ग (सिंधुदुर्ग), गांधीनगर, गडहिंग्लज व कसबा बावडा (कोल्हापूर), घोडेगाव आणि मंचर (पुणे), विटा (सांगली), उदगीर (लातूर), तुमसर (भंडारा), जवाहर (पालघर). ग्रामीण रुग्णालये : करकंब (सोलापूर), बिलोली व भोकर (नांदेड), बिडकीन (औरंगाबाद), वैभववाडी (सिंधुदुर्ग), देवळा (नाशिक), कागल (कोल्हापूर)
महिला रुग्णालय- हिंगोली.

Web Title: kayakalp award to pune district hospital