राजकारण ठेवा सोसायटीच्या गेटबाहेर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

पिंपरी - शहर विकासात ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना इच्छुकांनी निवडणुकीसाठी मुख्य ‘लक्ष्य’ केले आहे; मात्र गावकीभावकीच्या राजकारणात अजिबात रस नसणाऱ्या शहरातील जवळपास सर्व मोठ्या संस्थांनी राजकारणाला थेट बाहेरचा (नो एंट्री) रस्ता दाखविला आहे. किंबहुना, ‘‘पक्षीय राजकारण सोसायटीच्या गेटबाहेर,’’ अशी तंबीही सभासदांना दिली आहे. 

पिंपरी - शहर विकासात ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना इच्छुकांनी निवडणुकीसाठी मुख्य ‘लक्ष्य’ केले आहे; मात्र गावकीभावकीच्या राजकारणात अजिबात रस नसणाऱ्या शहरातील जवळपास सर्व मोठ्या संस्थांनी राजकारणाला थेट बाहेरचा (नो एंट्री) रस्ता दाखविला आहे. किंबहुना, ‘‘पक्षीय राजकारण सोसायटीच्या गेटबाहेर,’’ अशी तंबीही सभासदांना दिली आहे. 

पिंपळे सौदागर आणि वाकडमधील शंभरपेक्षा अधिक सदनिका असलेल्या बहुतेक सोसायट्यांनी असे अलिप्तवादी धोरण अवलंबलेले आहे. निवडणूक महिनाभरावर आल्याने इच्छुकांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराची राळ उडवून दिली आहे. त्यामध्ये पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरवमधील सोसायट्यांतील मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. काही छोट्या सोसायट्यांनी आपले प्रश्‍न सोडवून घेतले आहेत; पण त्याचे प्रमाण नगण्यच आहे. मोठ्या सोसायट्यांनी मात्र राजकारणाला ‘नो एंट्री’च ठेवली आहे. एखादी सभा ठेवण्यापलीकडे त्यांनी राजकारणाला थारा दिला नाही. एवढेच नव्हे, तर सोसायटीमध्ये येणारी पत्रके, दिनदर्शिका व प्रचार साहित्याला गोदामाचा रस्ता दाखविला आहे. 

नो एंट्रीचा फलक
पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड सोसायटीने प्रवेशद्वारावर फलक लावून सभासदांना त्रास न देण्याची विनंती इच्छुकांना केली आहे. गेट टू गेदरच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या पार्ट्यांनाही नकार दिला आहे. 

सर्वाधिक मतदान करणाऱ्या सोसायटीला प्रशस्तिपत्रक
सर्वाधिक मतदान करणाऱ्या सोसायट्यांना पारितोषिक देण्यासाठी सहकार विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचे सहकार विभागाचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. सर्वाधिक मतदान करणाऱ्या सोसायटीला प्रशस्तिपत्रक देण्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सहकारी सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी सहकार विभाग आणि महापालिका यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरू आहेत. मतदानासंदर्भात जनजागृतीसाठी मेळावे घेण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत दोन मेळावे घेण्यात आले असून, त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पोखरकर यांनी स्पष्ट केले.  सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर बूथ स्वयंसेवकपदाची जबाबदारी राहणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्‍चित केले आहे. वॉर्ड निवडणूक अधिकारी आणि सहकारी गृहरचना संस्थेतील सभासद यांच्यामधे समन्वय साधण्याचे काम बूथ स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Web Title: Keep politics out of the gate of the Society