केळकर संग्रहालयातील अद्भुत वस्तूंचा खजिना (व्हिडिओ)

केळकर संग्रहालयातील अद्भुत वस्तूंचा खजिना (व्हिडिओ)

पुणे - कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच बघणारा  घोडा, धान्य ठेवण्यासाठी लाकडी हत्ती  अशा अजब वस्तू पाहताना मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही आश्चर्य वाटतं. दैनंदिन वापरातल्या अनेक प्राचीन व कलात्मक वस्तूंचा राजा दिनकर केळकर संग्रहालयातील खजिना पाहणं ही मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्वणी ठरू शकते.  

शॅडो पपेट, कळसूत्री बाहुल्या, भातुकलीच्या खेळातली चिमुकली भांडी, एकोणिसाव्या शतकात मुलं वापरत ते कपडे, ढाल-तलवारी यांसारख्या ऐतिहासिक वस्तूंचा  राजा दिनकर केळकर संग्रहालयातील प्रचंड  खजिना थक्क करणारा आहे.
 

इथले संचालक सुधन्वा रानडे म्हणाले, " प्राचीन काळी माती, लाकूड तसेच धातूंची खेळणी असायची. त्यांचे आकार, रंग आणि कलाकुसर आजही लक्ष वेधून घेते. या संग्रहालयात मुलांसाठी एक खास दालन आहे. त्यात खेळणी, पपेटस् , कपडे वगैरे साहित्य आहे. ते पाहून मुलांना पारंपरिक वस्तूंची माहिती होण्याबरोबरच मनोरंजनही होते.

"इथल्या तऱ्हेतऱ्हेच्या गणेशमूर्ती पाहण्यात मुलं रंगून जातात. तीन-चार शतकांपूर्वीचे कलात्मक दरवाजेही आकर्षित करतात. जुन्या काळी युद्धात वापरली जाणारी हत्यारं पाहताना कल्पनेत आपण त्या काळात जाऊन पोहोचतो. वेगवेगळ्या प्रकारची वाद्यं पाहताना, त्यांतून कशा तऱ्हेचा ध्वनी निघत असेल असं मनात येतं. विविध प्रकारचे दिवे मोहून घेतात. कागद, काच व चामड्यावर काढलेली चित्रं बघत राहावीत अशी आहेत. अनेक वस्तूंचा हा अजबखाना मुलांसाठी वेगळीच मौज ठरू शकतो. 

एनी टाइम मोदक 
या तीनमजली संग्रहालयातील पहिल्या मजल्यावरवर मुलांसाठीचं एक वैशिष्ट्यपूर्ण एटीएम यंत्र ठेवण्यात आलं आहे.  हवे तेव्हा मोदक मिळवण्यासाठी ते तयार करण्यात आलं. त्यातून छोट्या डब्या बाहेर पडतात. त्यात मोदक किंवा दुसरा खाऊ असू शकतो. असं हे मजेदार खाऊ पुरवणारं यंत्र सध्या बिघडलं आहे, अशी माहिती संचालकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com