kerala flood : महापुराचा पर्यटनाला फटका 

#kerala flood : Tourism for kerala has affected to flood
#kerala flood : Tourism for kerala has affected to flood

अल्लपी, ता. 26 : केरळातल्या प्रत्येक जिल्ह्याचे काही ना काही वैशिष्ट्य आहे, त्रिशूरमधल्या केळीच्या बाग, एर्नाकुलममध्ये उद्योगधंदे, कोल्लममध्ये काजूचे उत्पादन आणि अल्लपीचे वैशिष्ट्य म्हणजे गावागावांमधील पर्यटन क्षेत्र! अल्लपीच्या बाजूने वाहणाऱ्या पम्बा नदीमुळे इथले पर्यटन क्षेत्र विस्तारले असून, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे. 

वर्षातले नऊ महिने पर्यटकांची या जिल्ह्याला पसंती मिळते. यंदा मात्र हंगामाच्या सुरवातीला या क्षेत्रावर आभाळ कोसळले आणि या व्यवसायावर पोट असलेल्या लोकांना आता जगण्याची भ्रांत पडली आहे. पर्यटकांनाच काय तर, पुराच्या पाण्यामुळे अनेक गावकऱ्यांना आपल्या घरातदेखील पाय ठेवता येत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. 

अल्लपीतून शेजारच्या गावांमध्ये जाऊन वस्तुस्थिती टिपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गावांमध्ये हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतकी माणसं दिसत होती. गेल्या दोन महिन्यांपासून पम्बा नदीलगतच्या गावांना पुराने वेढले. त्याचा कुट्टनाड, चेन्नमगिरी, कंगन, मंगिरी, कैंनगिरी व रामगिरी या गावातील एक लाख ते सव्वा लाख रहिवाशांना फटका बसला. प्रवाशांना बोटिंगची सफर घडून आणणे हे त्यांच्या रोजीरोटीचे साधन आहे. त्यातून अनेकांचे संसार उभारले आहेत; पण या भागात दोन-अडीच महिन्यांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नदीकाठालगतची घरे पाण्यात गेली आहे. या ठिकाणी आजही जवळपास पाच ते सहा फूट पाणी आहे. 

कैंनगिरीतील रहिवासी अनिल यांच्या घराची पाहणी केली असता, घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाल्याचे दिसून आले. लहान मुले आणि महिलांना शिबिरात हलविण्यात आले आहे. एखादा पुरुष जमेल तसे घरात येऊन साफसफाईचा प्रयत्न करताना दिसत होता. अनिल म्हणाले, ""माझ्या घरात गेल्या 70 दिवसांपासून पाणी आहे. आमच्या मदतीला कोणीही आलेले नाही. सरकारी अधिकारी फिरकले नाहीत. पर्यटकांना सेवा पुरविण्याचा माझा व्यवसाय आता बंद असून, बोटही खराब झाल्या आहेत. यामुळे अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.'' 

जिल्हा पर्यटन विकास अधिकारी मालीन एम. म्हणाले की, या भागात सुमारे दोन हजार बोटी आहेत. ऑगस्ट ते फेब्रुवारीपर्यंत या भागात देशासह परदेशातील पर्यटक येतात. या काळात दररोज 34 हजार पर्यटक या भागात येत असतात. मात्र, पाण्यामुळे आता पर्यटक येत नाहीत.'' 

पर्यटनाची ठिकाणे 
अल्लापी, मुन्नार, कोल्लम, 

बोटीचे प्रकार : 
हाउस बोट, शिकार बोट, मोटार बोट, कयाकी बोट, 
 
पर्यटनाची हंगामी नऊ महिन्यांतील उलाढाल : 
50 कोटी रुपये (अंदाजे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com