बाप्पाला नमस्कार पावणार?

khabarbat-social-media
khabarbat-social-media

गणेश जयंतीच्या निमित्ताने इच्छुकांची मांदियाळी मंगळवारी बहुतेक गणेश मंडळांच्या मांडवाखाली होती. त्याला कोणताच राजकीय पक्ष अपवाद नव्हता. उमेदवारी निश्‍चित झालेली नसली तरी, इच्छुक पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घालून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेताना दिसत होते. त्या वेळी मंडळातील बाप्पाला नमस्कार करताना, मंडळाच्या अध्यक्षांना भेटतानाची छायाचित्रे मोबाईलवर आपसूक निघत होती. निघालेली छायाचित्रे लगचेच फेसबुकच्या वॉलवर झळकत होती तर, काही छायाचित्रे व्हॉट्‌सऍप ग्रुपवर वेगाने व्हायरल होत होती.

काही इच्छुकांनी गणेश जयंतीची पर्वणी साधत जेवणावळीही घातल्या आणि खुद्द स्वतः भाविकांची काळजी घेताना दिसत होते. अन्‌ त्याचीही छबी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. काही झाले तरी, मंडळाचे कार्यकर्ते पावले पाहिजेत, अशी मनीषा बाळगून मंडळांच्या उपक्रमांनाही काही इच्छुक सढळ हाताने हातभार लावताना दिसत होते. तोरण, फुलांचे भले मोठे हारही बाप्पाला अर्पण होतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर आवर्जून टाकली जात होती.

निवडणुकीच्या काळातील कार्यकर्ते-मतदारांची मनधरणी आणि बाप्पाला घातलेली आळवणी कितपत यशस्वी होईल, पहिल्यांदा उमेदवारांच्या यादीतून दिसणार अन्‌ नंतर मतपेटीतून. त्यामुळे किमान "टोकन' तरी बाप्पापर्यंत पोचल्यावर पुढची खेपही निश्‍चित आहेच, असेही इच्छुक सांगत होते. उमेदवारी निश्‍चित असलेले माननीय मात्र आत्मविश्‍वासाने दिवसात 25-30 मंडळे केल्याचे सांगत होते अन्‌ त्याचे पुरावेही व्हॉट्‌सऍपवर दाखवत होते. त्यामुळे गणेश जयंती बाप्पाची धुमधडाक्‍यात साजरी होताना यंदा दिसली. फेसबुक, व्हॉट्‌सऍपबरोबरच ट्विटरची टिवटिववाट आणि इन्स्टाग्रामवरचे अपडेटही झळकण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com