पुण्यासाठी तीन टीएमसी पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

गतवर्षी खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन या प्रमाणे एकूण सहा आवर्तने शेती सिंचनासाठी दिली आहेत.
-पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

शेटफळगढे  : खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर सुमारे पाऊण टीएमसी जादा पाणीसाठा आहे. गतवर्षी प्रकल्पात आजअखेर ३.५७ टीएमसी पाणी होते, यंदा ते सुमारे ४.१६ टीएमसी आहे. यातील सुमारे तीन ते सव्वातीन टीएमसी पाणी हे पुणे शहराला पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे. ते शहराला येत्या एक ऑगस्टपर्यंत पुरविले जाणार आहे. 

गतवर्षी चांगल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यामुळे सात वर्षांनंतर या कालव्यातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडले आहे. त्यामुळे ऊस व इतर पिकांना फायदा झाला आहे. पुण्यासह इंदापूर, दौंड या शहराबरोबरच हवेली, दौंड, इंदापूर व बारामती तालुक्‍यातील एकूण २९ पाणी योजना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. 

सध्या १ हजार ४०० क्‍युसेक वेगाने सुरू असलेले उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन येत्या सात दिवसांत बंद केले जाणार आहे. आजअखेर या प्रकल्पातील वरसगाव व टेमघर धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. सध्या यातील ग्राउटिंगचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येत्या पावसाळ्यात या धरणात पाणीसाठा केला जाणार आहे. मात्र, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी खडकवासला धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी टेमघरचे पाणी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये खालच्या धरणात सोडले जाणार आहे. त्यानंतरच टेमघर धरणाच्या उर्वरित दुरुस्तीचे काम डिसेंबरनंतर सुरू केले जाणार आहे. 

गतवर्षी खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन या प्रमाणे एकूण सहा आवर्तने शेती सिंचनासाठी दिली आहेत.
-पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

Web Title: Khadakvasla dams water stock