साडेआठ टीएमसी साठा कमी

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 23 जुलै 2019

खडकवासला प्रकल्पात पुणे शहराला दहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे. सध्या पाणीकपातीचे नियोजन नाही. परंतु, आवश्‍यकतेनुसार दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

खडकवासला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाऊस
पुणे - जुलै महिना संपत आला, तरी खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. पर्यायाने प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल साडेआठ अब्ज घनफुटाने (टीएमसी) कमी आहे. दरम्यान, या प्रकल्पात शहराला दहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा जूनमध्ये पाऊस उशिराने सुरू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे या चार धरणांतील पाणीसाठा निम्म्याच्या जवळपास पोचला. परंतु, पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल साडेआठ टीएमसीने कमी आहे. या प्रकल्पातून केवळ पुणे शहरालाच नव्हे, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांना पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो.

यासोबतच रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी आवर्तने दिली जातात. या प्रकल्पात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत १४.८५ टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच ५१ टक्‍के साठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २३.३० टीएमसी (८० टक्‍के) पाणीसाठा होता. 

यासंदर्भात जलसंपदा विभागाशी संपर्क साधला तेव्हा धरणांतील साठा पाहता पाण्याची काटकसर करण्यास प्राधान्य द्यावे लागेल, असे मत वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्‍त केले.

भीमा खोऱ्यातील चार धरणे कोरडीच
भीमा खोऱ्यातील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिंपळगाव जोगा, घोड, विसापूर आणि नाझरे या चार धरणांमधील पाणीसाठा शून्यच आहे. उजनी धरणात उणे १४.८७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. कळमोडी धरण पूर्ण भरले असून, उर्वरित धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर पोचला आहे. भीमा खोऱ्यातील एकूण २५ धरणांपैकी कळमोडी धरण भरले आहे. या धरणाची क्षमता दीड टीएमसी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasala Dam Water Storage Rain