खडकवासला-किरकटवाडीतील पूराचा धोका मानवनिर्मित? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mountain digging

डोंगर फोडून रस्ता केल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला; प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त.

खडकवासला-किरकटवाडीतील पूराचा धोका मानवनिर्मित?

किरकटवाडी - मागील दोन वर्षांपासून खडकवासला व किरकटवाडी येथील अनेक घरं व दुकानांमध्ये रस्त्यावरुन वाहणारे पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान होत आहे. जवळच असलेला डोंगर फोडून रस्ता तयार करण्यात आलेला असल्याने डोंगरावरील पूर्ण पाण्याचा लोंढा शीव रस्त्यावरुन वाहत असून तेच पाणी घरं व दुकानांमध्ये शिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोन वर्षांपासून मोठा पाऊस झाला की ही समस्या उद्भवत असून अद्याप प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

खडकवासला गावच्या कोल्हेवाडी या भागात व किरकटवाडी गावच्या शिवनगर या भागात मागील दोन वर्षांपासून मोठा पाऊस झाला की शीव रस्त्यावरुन वाहणारे पाणी घरं व दुकानांमध्ये शिरल्याने रहिवासी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. शीव रस्त्याच्या वरच्या भागात असलेला डोंगर फोडून दोन वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आलेला आहे. त्या रस्त्यामुळे डोंगर पठारावरील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून पाण्याचा मोठा लोंढा दगड-मातीसह मुख्य शीव रस्त्यावरुन वाहू लागला आहे. पाण्याचा वेग एवढा जास्त असतो की डोंगर उतारावरील खडकही फुटून खाली रस्त्यावर येत आहे. यापूर्वी असे कधीही होत नव्हते मात्र सदर रस्ता करण्यात आल्यापासून नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे मत असून संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.

'मागील तीस वर्षांत शीव रस्त्यावरुन एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कधीही वाहताना पाहिले नाही. रस्त्यासाठी डोंगर खोदल्याने पाण्याचा प्रवाह बदलला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून अशाप्रकारे घरं व दुकानांमध्ये पाणी शिरत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.'

- शैलेंद्र मते, नागरिक, शिवनगर, किरकटवाडी.

'डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याचा वेग एवढा जास्त असतो की आमच्या शेताचा भराव वाहून गेला आहे. दुर्दैवाने अतिवृष्टी झाल्यास कोल्हेवाडी व शिवनगर भागात या पाण्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.'

- मनोज मते, नागरिक, खडकवासला.

'खडकवासला व किरकटवाडी येथील डोंगरावरुन शिवनगर भागात पाणी येत आहे त्याबाबत हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास सांगितले आहे.'

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.