दोन ठेकेदारांविरुद्ध 700 कोटींचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

टेमघर धरण गळतीप्रकरणी जलसंपदा खाते उच्च न्यायालयात; गिरीश महाजन यांची माहिती

टेमघर धरण गळतीप्रकरणी जलसंपदा खाते उच्च न्यायालयात; गिरीश महाजन यांची माहिती
खडकवासला - 'टेमघर धरणाचे बांधकाम करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह आणि हैदराबाद येथील श्रीनिवासन या दोन ठेकेदारांविरुद्ध नुकसान भरपाईपोटी उच्च न्यायालयात 700 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. धरणाच्या गळतीची दुरुस्ती करण्याबाबत त्यांना नोटिसा दिल्या होत्या; परंतु त्यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई केली आहे,'' अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

टेमघर धरणाच्या गळती दुरुस्तीचे 100 कोटी रुपयांची निविदा काढली असून, हे काम औरंगाबाद येथील "एसएसपीएल' या ठेकेदार कंपनीला दिले आहे. सध्या हे काम सुरू असून, महाजन यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

महाजन म्हणाले, 'धरणाच्या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी धरण यापूर्वीच पूर्ण रिकामे करण्यात आले होते. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी यंदा 15 ऑक्‍टोबरपासूनच या धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडले जाणार आहे. एक जानेवारी 2018 पर्यंत धरण पुन्हा रिकामे करून उर्वरित कामे पूर्ण करणार आहे. 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. पावसाळ्यातदेखील काम सुरू राहणार आहे. सध्या ड्रिलिंग आणि ग्राउटिंगचे काम केले जाणार आहे.''

या वेळी पाटबंधारेच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी बोलभट, भामा आसखेड धरणाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. प्रदक्षिणे, गुणनियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप तवार, शाखा अभियंता सुधीर अत्रे, खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार, शाखा अभियंता आर. एस. क्षीरसागर उपस्थित होते.

एक्‍सपर्ट पॅनलची नियुक्ती
ही कामे तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार केली जात असून, यासाठी खडकवासला जल व विद्युत संशोधन संस्थेची मदत घेतली जात आहे. दुरुस्तीच्या कामांची परिणामकारकता तपासण्यासाठी स्वतंत्र "पॅनल ऑफ एक्‍सपर्ट' नियुक्त केले आहे. त्यामध्ये केंद्रीय जल आयोग, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. धरणाच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची चाचणी नामांकित प्रयोगशाळांमधून नियमितपणे सुरू आहे, असे महाजन म्हणाले.

Web Title: khadakwasala pune news 700 crore claim case on two contractor