खडकवासलाचे पाणी मृगजळच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कळस - इंदापूर तालुक्‍यासाठी खडकवासला कालव्याने उन्हाळी आवर्तन दिल्याने आनंदी झालेल्या शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीने घोर निराशा केली आहे. वीज वितरण कंपनीने कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठाच खंडित केल्याने शेतकऱ्यांना नुसते कालव्यातील पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. 

कळस - इंदापूर तालुक्‍यासाठी खडकवासला कालव्याने उन्हाळी आवर्तन दिल्याने आनंदी झालेल्या शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीने घोर निराशा केली आहे. वीज वितरण कंपनीने कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठाच खंडित केल्याने शेतकऱ्यांना नुसते कालव्यातील पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ उपसा सिंचन योजनेचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश दिला असताना, प्रत्यक्षात मात्र वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची सरसकट वीज बंद करण्याचा अजब पराक्रम केला आहे. वाढत्या उन्हामुळे अगोदरच हैराण झालेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने मोठा झटका दिला आहे. यानिमित्ताने वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

सध्या खडकवासला कालव्याचे उन्हाळ्यातील शेतीसिंचनासाठी दुसरे आवर्तन सुरू आहे. खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रापैकी सर्वाधिक लाभक्षेत्र इंदापूर तालुक्‍यामध्ये आहे. ६७ हजार हेक्‍टरपेक्षा जास्त लाभक्षेत्र असलेल्या या तालुक्‍यातील प्रत्यक्ष सिंचनाखालील क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष, पाणी वितरणाचे ढिसाळ नियोजन, पाणीगळती व चोरी यांबरोबरच तालुक्‍याला मिळणारे अपुरे पाणी यामुळे कालव्यालगतच्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कालव्याचे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. दरम्यान, कालव्याचे पाणी बिनभरवशाचे झाल्याने पाण्यासाठी पास घेण्यासही शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. पाणी येईल तेव्हाच अधिकाऱ्यांचे हात ओले करून पाणी शेतात घेण्याचे प्रकारदरम्यानच्या काळात वाढल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीनंतर यंदा प्रथमच उन्हाळ्यात ठरल्याप्रमाणे दुसरे आवर्तन देण्यात आले आहे. मात्र, विजेअभावी हे पाणी काय कामाचे, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. एकीकडे शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चाललेली असताना, दुसरीकडे पाणी असून विजेअभावी देता येत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. वीज वितरण कंपनीच्या लोणी शाखेचे अभियंता महेश पवार, उपअभियंता आर. एम. गोफणे, जनसंपर्क अधिकारी आरदांड आदींनी याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही.

‘नुकसानभरपाईची मागणी करणार’
ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक जनार्दन पांढरमिसे म्हणाले, ‘‘वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कालव्यावरील उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा बंद करण्याचे पत्र दिलेले असताना, प्रत्यक्षात मात्र सरसकट शेतकऱ्यांची वीज बंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पास घेतलेले असताना, विजेअभावी पाणी देणे सध्या शक्‍य नाही. दिवसांतून किमान दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे विहिरींचे पाणीही पिकांना देणे शक्‍य होत नाही. हा शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. याबाबत आम्ही वीज नियामक आयोगाकडे नुकसानभरपाईची मागणी करणार आहोत.’’

खडकवासला कालव्याच्या आवर्तन काळात वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले असल्याने त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
- गणेश लटपटे, कार्यकारी अभियंता, बारामती मंडळ

Web Title: khadakwasala water agriculture