Khadakwasla Dam : पर्यटकांना खडकवासला धरण पाणलोट क्षेत्राच्या २० किलोमीटर परिघात बंदी

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरण्यास बंदी असताना अनेक पर्यटक जिवावर उदार होऊन पाण्यात उतरतात.
Khadakwasla Dam
Khadakwasla Damsakal
Summary

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरण्यास बंदी असताना अनेक पर्यटक जिवावर उदार होऊन पाण्यात उतरतात.

पुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरण्यास बंदी असताना अनेक पर्यटक जिवावर उदार होऊन पाण्यात उतरतात. या पार्श्‍वभूमीवर खडकवासला धरणाच्या मागील बाजूच्या २० किलोमीटर पाणलोट क्षेत्राच्या परिघात पर्यटकांना जाण्यास निर्बंध घालण्याचा विचार जलसंपदा विभाग करीत आहे. लवकरच त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून सोमवारी दोन मुलींचा मृत्यू झाला. इतर पाच मुलींचा प्राण वाचविण्यात स्थानिकांच्या सतर्कतेमुळे यश आले. पर्यटकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडलेला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या या पर्यटक मुलींनी धरणाच्या मागील बाजूने पाण्यात प्रवेश केला. पाण्यात उतरू नये असे फलक त्या ठिकाणी लावले असताना, त्यांनी धरणाचा कुठलाच अंदाज न घेता, त्या पाण्यात उतरल्याने ही घटना घडली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अशी आहे स्थिती

  • खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र हे शहरापासून अत्यंत जवळ आहे.

  • या धरणाच्या दोन्ही बाजूचे २० ते २२ किमीचे पाणलोट क्षेत्र आहे.

  • त्यामुळे सातत्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

  • उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या कालवधीत पाणलोट क्षेत्रात एरवीपेक्षा जास्त गर्दी असते.

  • या धरणातून शहरला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे त्यांच्या जलाशयात उतरण्यास जलसंपदा विभागाने बंदी घातली आहे.

  • बंदी असल्याचे फलकही धरणाच्या ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत

  • धरण परिक्षेत्रात दहा सुरक्षारक्षक तैनात केले आहेत

  • पोलिस विभागाकडून देखील सुरक्षेसाठी मदत घेण्यात येते

  • धरणात उतरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड देखील आकारला जातो

  • असे असून देखील पर्यटक नजर चुकवून मागील बाजूने धरणात उतरतात

धरणाजवळ चौपाटी असलेल्या भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या सहाय्याने नुकत्याच जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच धोकादायक आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच दररोज १० सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने पर्यटक धरणाच्या मागील बाजूने जात पाण्यात उतरत आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडत असल्याने धरणाच्या मागील बाजूने पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com