पुणे : खडकवासला धरणातील पाण्याचा रंग झाला तांबडा

माती वाहून जात असल्याने ग्रामस्थांना चिंता
Khadakwasla
Khadakwaslasakal

पुणे : खडकवासला (Khadakwasla) धरणातील (dam) पाण्याचा रंग बदललाय. पावसाळ्यात जमा झालेले पाणी गढूळ असते; पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तांबडी माती वाहून येऊन पाण्याचा रंगच बदलून गेला, असे कधी पाहिले नव्हते, असे ग्रामस्थांनी सांगितले. खडकवासला (Khadakwasla) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वन जमिनींमध्ये सुरू असलेली वृक्षतोड आणि डोंगर फोडण्याचे प्रकार यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. (Khadakwasla dam water red)

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरे, गावे पाण्याखाली गेली पण दरड पडल्याने आख्खे गावही जमिनीखाली गाडले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात हिरवा शालू पांघरून लहान- मोठ्या धबधब्यांनी सजलेला हा डोंगराचा परिसर आकर्षक वाटत असला तरी, गेल्या काही वर्षापासून या डोंगरांच्या कुशीत राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये डोणजे, खानापूर, मणेरवाडी, मालखेड, वर्दाडे, निगडे, कुडजे, खडकवाडी, आगळंबे, मांडवी यासह इतर अनेक छोटी, मोठी गावे आहेत. ‘सकाळ’ने या गावांची पाहणी केली.

या गावांमध्ये डोंगरांवर बरीच खासगी वन जमीन आहे, तेथे बांधकाम करण्यावर अनेक मर्यादा आहेत. मात्र, सगळ्या नियमांना फाटा देऊन मोठे मोठे बंगले, रिसॉर्ट, फार्म हाऊस बांधले आहेत. आत्ताही अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. डोंगर फोडून त्या ठिकाणी रस्ते केले जात आहेत. या डोंगरावरून खडकवासला धरणाचे दृश्‍य व्यवस्थित दिसावे, यासाठी तोडफोड केली जात आहे.

Khadakwasla
पुणे राष्ट्रवादीचं कार्यालय पुन्हा वादात; काळ्या बाहुलीवर अंनिससह भाजपचाही आक्षेप

निगडे-ओझर्डे येथे डोंगरावर बांधकाम सुरू आहे, तेथेच खाली डोंगरावरील माती रस्त्यावर आली आहे. याच भागात डोंगर फोडून रस्ते केले आहेत. जांभळी शिवारात डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात सपाटीकरण झाले आहे. पावसाळ्यामुळे हिरवळ वाढल्याने अनेक ठिकाणी डोंगर फोडले असले तरी ते दिसत नसल्याचे यावेळी समोर आले. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगरांवर बेकायदा उत्खनन सुरू असताना याकडे वन विभाग आणि महसूल खात्याचे सोईस्कररीत्या दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

उपवन संरक्षक राहुल पाटील म्हणाले, की गेल्या वर्षभरात आम्ही नवीन बांधकामांना परवानगी दिलेली नाही. जे काही बांधकामे झाली आहेत, ती जुनी आहेत. खासगी वन जमिनीवर ०.४ पेक्षा जास्त बांधकाम होत असेल, न्यायालयीन प्रकरण नसेल तर आम्ही त्वरित कारवाई करतो. अशा प्रकारचे बेकायदा काम होत असेल तर नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. आम्ही कारवाई करू. नुकतीच लोणावळा येथे एक कारवाई केलेली आहे.

Khadakwasla
पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात डोंगरांमध्ये विशेषतः नदीच्या जवळ असलेल्या डोंगरांवर चांगला ‘व्ह्यू पॉइंट’ मिळतो, त्यामुळे तेथे सपाटीकरण सुरू आहे. यापूर्वी पूर आल्यानंतर खडकवासला धरणाचे पाणी गढूळ झालेले पाहिले आहे; पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तांबडा रंग कधीही आलेला नव्हता. कोकणात दरडी पडल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

- विठ्ठल ठकार, सरपंच, वर्दाडे

पहिल्या पावसाने धरणात गढूळ पाणी येत असते. पण डोंगरातून माती वाहून आल्याने पाण्याचा रंग बदलला आहे, असे ग्रामस्थांचे निरीक्षण असू शकते. पण आमच्या दृष्टीने पहिल्यांदा आलेले पाणी गढूळ असते, कालांतराने ते स्वच्छ होते.

- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com