खंडोबा मंदिरातील उत्पन्न 50-50

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

जेजुरी - जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील पुजारी, गुरव, वीर, कोळी, घडशी समाजबांधव व श्री मार्तंड देवसंस्थान समिती या दोघांमध्ये मुख्य मंदिर दानपेटीतील उत्पन्नाच्या हिश्‍श्‍याबाबतचा निर्माण झालेला पेच अखेर सुटला.

जेजुरी - जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील पुजारी, गुरव, वीर, कोळी, घडशी समाजबांधव व श्री मार्तंड देवसंस्थान समिती या दोघांमध्ये मुख्य मंदिर दानपेटीतील उत्पन्नाच्या हिश्‍श्‍याबाबतचा निर्माण झालेला पेच अखेर सुटला.

देवसंस्थान व पुजारी यांना उत्पन्नाचे वाटप समान करण्याचे ठरले आहे.
प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा, विश्वस्त संदीप जगताप, पंकज निकुडे, शिवराज झगडे, ॲड. अशोकराव संकपाळ, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, नगरसेवक जयदीप बारभाई आदी उपस्थित होते. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात वंश परंपरा, रीतिरिवाजानुसार धार्मिक विधी, पूजाअर्चा आदी माध्यमातून आपली सेवा बजावत उदरनिर्वाह करणारे गुरव, वीर, कोळी, घडशी आणि मार्तंड देवसंस्थान समिती यांच्यामध्ये मुख्य मंदिर दानपेटीतील उत्पन्न हिस्स्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पेच निर्माण झाला होता. न्यायालयात याबाबत याचिका दाखल झाली होती. २०१५ मध्ये मुख्य मंदिर गाभाऱ्यातील दानपेटीतील ५० टक्के रक्कम समस्त गुरव, वीर, कोळी, घडशी यांना, तर ५० टक्के रक्कम मार्तंड देवसंस्थान समितीने घेण्याचे आपापसांत समझोत्याने ठरले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ पासून गुरव, वीर, कोळी, घडशी यांना त्यांचे उत्पन्नाचे हिस्स्याचे धनादेश अदा करण्यात आले नव्हते. त्यातच डिसेंबर २०१७ मध्ये नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. गेल्या आठवड्यात पुजारी, त्यांचे वकील ऑड. वळसंगकर, देवसंस्थान विश्वस्त व त्यांचे वकील ॲड. बक्षी यांच्यासमवेत समन्वयाने चर्चा होऊन दिवाणी दावा क्र.१६५०/९६ मधील समन्वयातून झालेल्या निर्णयातून दानपेटीतील ५० टक्के रक्कम पुजारी व ५० टक्के रक्कम देवसंस्थान यांनी घ्यावयाचे ठरले. प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा यांनी प्रास्ताविक केले. पंकज निकुडे पाटील यांनी आभार मानले.

सहा महिन्यांतील धनादेशांचे वाटप  
गेल्या सहा महिन्यांपासून पुजारी वर्गाचे थांबविण्यात आलेले उत्पन्नातील हिस्स्याचे धनादेश देवसंस्थानकडून शनिवारी (ता. १९) अदा करण्यात आले. पुजारी व देवसंस्थान समिती यांच्यामध्ये समन्वय व सलोखा राहावा, पुढील काळात भाविकांच्या धार्मिक विधीतील मागण्यांवर विचार व्हावा, असे दिलीप बारभाई यांनी सांगितले, तर पुजारी व देवसंस्थानमधील उत्पन्नाच्या हिस्स्याबाबतचा पेच सुटल्याचे समाधान नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी व्यक्त केले.

Web Title: khandoba temple income 50-50