उत्पादन, खर्चाचाही विचार व्हावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

पुणे - केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी काही पिकांची आधारभूत किंमत जाहीर केल्याचा प्रभाव बाजारावर पडला असला, तरी या हंगामात या पिकांचे उत्पादन चांगले झाल्यास त्याची खरेदी सरकारलाच करावी लागणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी उत्पादन खर्च आणि किती उत्पादन झाले याचाही विचार आधारभूत किंमत ठरविताना केला पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. 

पुणे - केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी काही पिकांची आधारभूत किंमत जाहीर केल्याचा प्रभाव बाजारावर पडला असला, तरी या हंगामात या पिकांचे उत्पादन चांगले झाल्यास त्याची खरेदी सरकारलाच करावी लागणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी उत्पादन खर्च आणि किती उत्पादन झाले याचाही विचार आधारभूत किंमत ठरविताना केला पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. 

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने धान, ज्वारी, बाजरी, तूर, मका, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कापूस, मूग आदी पिकांची आधारभूत किंमत ठरविली. ही किंमत खरीप हंगामासाठी असून, ती सध्या लागू होणार नाही. या पार्श्‍वभूमीवर बाजारात तेजी निर्माण झाली असली तरी ती फार काळ टिकणार नाही, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.

हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी लागवड क्षेत्र, हाती येणारे एकूण उत्पादन आणि आपली गरज या गोष्टींचा विचार करून सरकारने आधारभूत किंमत ठरविली पाहिजे. त्याचवेळी आयात आणि निर्यातीचे धोरणही सुसंगत हवे तरच आधारभूत किमतीनुसार मालाची खरेदी- विक्री होऊ शकते.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर

बाजारातील आवक आणि जावक यावर मालाचे भाव अवलंबून असतात. आवक जास्त झाली तर भाव कोसळतात. जगाच्या बाजारभावावर आपल्याकडील भावांत चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात संबंधित शेतमालाची स्थिती काय आहे, याचा विचार करायला हवा. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा सध्या खुल्या बाजारात भाव कमी आहेत. उत्पादन जास्त असल्यानेच हे भाव कमी राहिले आहेत. केवळ राजकीय लाभासाठी निर्णय जाहीर करण्याऐवजी वस्तुस्थितीचा अभ्यास करून आधारभूत किंमत ठरविल्यास ग्राहक व शेतकरी या दोघांनाही फायदा होऊ शकतो.
- वालचंद संचेती, व्यापारी 

आधारभूत किमती जाहीर केल्यानंतर काही मालाच्या भावांत निर्माण झालेली तेजी फार काळ टिकणार नाही. ही आधारभूत किंमत खरीप हंगामासाठी आहे. या हंगामात उत्पादन अद्याप किती निघेल, लागवड किती झाली याची आकडेवारी हातात नाही. सध्या देशात पाऊस चांगला पडत असल्याने शेतमालाचे उत्पादन चांगले झाले आणि खुल्या बाजारात भाव पडले तर आधारभूत किमतीनुसार केंद्र आणि राज्य सरकारला हा शेतमाल खरेदी करावा लागेल. तो त्यांनी खरेदी केला नाही तर शेतकऱ्यांवर बाजारात कमी भावात तो माल विकण्याची वेळ येऊ शकते. 
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र

Web Title: Kharip production expenditure central government