खेड-शिवापूर : तलाठी कार्यालयात अद्याप संगणक, प्रिंटर आणि इंटरनेट सुविधांचा अभाव

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

खेड-शिवापूर - महसुल विभागाचा कारभार ऑनलाइन झाला असून, ई फेरफार प्रणालीमुळे तलाठी कार्यालयातील विविध कामे वेगवान झाली आहेत. अशा परिस्थितीत शिवापूर (ता.हवेली) येथील तलाठी कार्यालयात मात्र अद्याप संगणक, प्रिंटर आणि इंटरनेट या सुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तर या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची अडचण असल्याचे खेड-शिवापुरचे मंडल अधिकारी एस. पी. पाटील यांनी सांगितले.

खेड-शिवापूर - महसुल विभागाचा कारभार ऑनलाइन झाला असून, ई फेरफार प्रणालीमुळे तलाठी कार्यालयातील विविध कामे वेगवान झाली आहेत. अशा परिस्थितीत शिवापूर (ता.हवेली) येथील तलाठी कार्यालयात मात्र अद्याप संगणक, प्रिंटर आणि इंटरनेट या सुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तर या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची अडचण असल्याचे खेड-शिवापुरचे मंडल अधिकारी एस. पी. पाटील यांनी सांगितले.

सुमारे पाच वर्षांपासून महसुल विभागाने तलाठी कार्यालयात इ-फेरफार संगणक प्रणाली सुरु केली आहे. त्यानुसार नागरीकांना सातबारे, आठ अ उतारे आणि फेरफार सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. तसेच नोंद घालणे, खरेदीखत, करणे, वारस नोंद करणे आदी कामेही लवकर होऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत शिवापूर येथील तलाठी कार्यालयात मात्र अद्याप संगणक, प्रिंटर, इंटरनेट कनेक्शन या सुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असून विविध कामांसाठी नागरीकांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरीक सातबारा आणण्यासाठी गेल्यावर गट नंबर लिहून घेतला जातो. त्यानंतर प्रांत कार्यालयात जाऊन कोतवाल आणि तलाठी हे सातबारे आणि फेरफार घेऊन येतात. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी नागरीकांना सातबारे उतारे आणि इतर कागदपत्रे हातात मिळतात. तर ऑनलाइनच्या कामासाठी तलाठ्यांना प्रांत आणि तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने आठवड्यातील अनेक दिवस तलाठी कार्यालय बंद असते. त्यामुळे तलाठी कार्यालयातील महत्वाच्या कामांसाठीही नागरीकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून शिवापूर तलाठी कार्यालयात आवश्यक सुविधा शासनाला उपलब्ध करता आल्या नाहीत. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होते आहे. महसुल विभागाने लवकरात-लवकर लक्ष घालून या तलाठी कार्यालयात आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अन्यथा आम्ही तलाठी कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा माजी जिल्हा परीषद सदस्य सोमनाथ लांडगे यांनी दिला आहे.

याबाबत खेड-शिवापूरचे मंडल अधिकारी एस. पी. पाटील म्हणाले, "शिवापूरचे तलाठी कार्यालय सरकारी जागेत नसून भाड़ेतत्वावर आहे. याठिकाणी संगणक, इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर या सुविधा उपलब्ध करायच्या आहेत, मात्र त्यासाठी शासनाचा निधी मिळत नसल्याने त्या सुविधा उपलब्ध होत नाहीत."

शिवापूर येथे तलाठी कार्यालयासाठी सरकारी जागा राखीव आहे. मात्र त्याठिकाणी तलाठी कार्यालय उभारण्यासाठी अद्याप शासकीय स्तरावर काहीही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवापूर तलाठी कार्यक्षेत्रातील सहा गावांचा कारभार दहा बाय दहाच्या भाडेतत्वावरील खोलीतून सुरु आहे.

Web Title: Khed-Shivapur: Lack of computer, printer and internet facilities still in the Talathi office