कात्रज घाटाला रात्री ‘टाटा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

खेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती असून अनेकांनी रात्री ये-जा करण्याचा मार्ग बदलला आहे. या पार्श्वभूमीवर कात्रज घाटात विजेचे खांब आणि पोलिसांची गस्त या गोष्टी गरजेच्या असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.

पुण्याचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणजेच कात्रजचा घाट. येथून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कायमच वर्दळ असते. त्यातच सध्या कात्रज घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खेड-शिवापूर, भोर तसेच वेल्हा या पट्ट्यातील अनेक जण नोकरीच्या निमित्ताने कात्रज घाट रस्त्यावरून ये-जा करतात. अनेकांना रात्री उशिरा घाट रस्त्यावरून ये-जा करावी लागते. मारहाणीच्या घटनेनंतर अनेक जण जुन्या घाटाऐवजी नवीन बोगद्याचा वापर करत आहेत. 

सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या कात्रज घाट रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था असावी. त्यासाठी घाट रस्त्यावर विजेचे खांब बसवावेत, अशी मागणी नागरीक करत आहेत. तसेच घाट रस्त्यावर असलेले बंद चेक पोस्ट सुरू करून पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, या दोन गोष्टी घाटात गरजेच्या असून त्या असल्यास घाटातील प्रवास सुरक्षित होईल, असे सुभाष भुरुक आणि प्रमोद गायकवाड या प्रवाशांनी सांगितले. घाटातील बंद असलेल्या चेक पोस्टविषयी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कात्रज घाटात प्रकाश व्यवस्था गरजेची आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीबाहेरच्या रस्त्यावरच विजेचे खांब बसविता येत नाहीत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी(सीएसआर)च्या माध्यमातून कात्रज घाटात प्रकाश व्यवस्था करण्यासाठी काही कंपन्या पुढे आल्या, तर त्यांना आवश्‍यक त्या सर्व परवानग्या देण्यात येतील.
- नकुल रणसिंग,  कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: khed shivapur loot in katraj ghat