'फास्टटॅग'च्या लेनमध्ये घुसखोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

खेड शिवापूर नाक्‍यावरील प्रकार; यंत्रणा योग्य पद्धतीने राबविण्याची मागणी

खेड शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्‍यावर इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन (ईटीसी) यंत्रणा असूनही "फास्टटॅग' असलेल्या वाहन चालकांची गैरसोय होत आहे. येथे "ईटीसी'साठी असलेल्या स्वतंत्र मार्गिकेतून इतर वाहनेही जातात. त्यामुळे "फास्टटॅग' असलेल्या वाहनांनाही टोलच्या रांगेत थांबावे लागत आहे. याबाबत "फास्टटॅग' असलेले वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत.

टोल नाक्‍यावर वाहनांना टोल देऊन बाहेर पडण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे टोल नाक्‍यावर वाहनांना थांबायला लागू नये, यासाठी अनेक टोल नाक्‍यांवर "ईटीसी' यंत्रणा बसविण्यात आली आहे. दोन वर्षांपासून खेड शिवापूर टोल नाक्‍यावरही "ईटीसी' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी ही यंत्रणा योग्य पद्धतीने राबवली जात नसल्याने "फास्टटॅग' असलेल्या वाहनांची अडचण होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या आवाहनानुसार गेल्या दोन वर्षांत अनेक वाहनचालकांनी आपल्या वाहनांना "फास्टटॅग' बसविले आहेत. खेड शिवापूर टोल नाक्‍यावरून दररोज सुमारे दोन हजार "फास्टटॅग' असलेली वाहने जातात. मात्र, या ठिकाणी या वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी "फास्टटॅग' असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. मात्र, त्यातून इतर वाहनेही सर्रास जातात. त्यामुळे "फास्टटॅग' असलेल्या वाहनांनाही इतर वाहनांप्रमाणे रांगेत थांबावे लागत आहे. टोल प्रशासनाने "ईटीसी' यंत्रणा योग्य पद्धतीने राबवावी, असे प्रवासी ऋत्विज नाईक यांनी सांगितले.

"फास्टटॅग' असलेल्या वाहनांसाठी दोन्ही टोल नाक्‍यांवर स्वतंत्र मार्गिका आहेत. मात्र, सध्या रस्त्यावर गर्दी असल्याने इतर वाहनेही या मार्गिकेतून जातात. पण, लवकरच दोन्ही टोल नाक्‍यांवर "ईटीसी' मार्गिका वाढविण्यात येणार आहे, असे टोल प्रशासनाने सांगितले.

"फास्टटॅग'मधून ऑनलाइन टोल
"ईटीसी' यंत्रणेत वाहनाच्या काचेवर "फास्टटॅग' लावला जातो. हा टॅग ऑनलाइन रिचार्ज केला जातो. टोल नाक्‍यावरील "ईटीसी' यंत्रणा असलेल्या मार्गिकेत या वाहनावरील "फास्टटॅग' रीड केला जातो. त्यातून ऑनलाइन टोल घेतला जातो. त्यामुळे वाहन न थांबता तत्काळ पुढे जाते.

Web Title: khed shivapur toll plaza infiltration in the FastTag Lane