खेडचा पर्यटन विकास दृष्टिपथात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

राजगुरुनगर - खेड तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे होण्याची शक्‍यता बळावली आहे. या संदर्भात मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. खेडचे आमदार सुरेश गोरे या वेळी उपस्थित होते. या वेळी अहवाल सादर करण्याचा आदेश रावल यांनी दिला.

राजगुरुनगर - खेड तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे होण्याची शक्‍यता बळावली आहे. या संदर्भात मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. खेडचे आमदार सुरेश गोरे या वेळी उपस्थित होते. या वेळी अहवाल सादर करण्याचा आदेश रावल यांनी दिला.

आमदार गोरे यांनी सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. चासकमान व भामा आसखेड धरण प्रकल्प कार्यालयांच्या इमारती व जमिनी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचा गोरे यांनी मांडला. त्यावर रावल यांनी तत्काळ सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचा आदेश महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. 

चासकमान आणि भामा आसखेड धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर चासकमान प्रकल्पाचे १३१ निवास कक्ष, १ विश्रांतिगृह आणि १३ हेक्‍टर जमीन, तसेच भामा आसखेडचे जवळपास ७८ निवासी कक्ष, १ विश्रांतिगृह, १ कम्युनिटी हॉल आणि १८ हेक्‍टर जमीन अनेक वर्षे विनावापर पडून आहे. धरण परिसरात पर्यटक आकर्षित होत असतात. म्हणून जलसंपदा विभागाच्या जागा आणि इमारती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित करून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार गोरे यांनी केली.

पर्यटन विकास कोठे व कसा...
सह्याद्री पर्वतरांगेतील भीमाशंकर डोंगररांग या भागाला लागून आहे. ऐन पावसाळ्यात धबधबे कोसळत असतात. निर्झर खळाळत असतात. पाऊस बरसत असतो. डोंगर, झाडी आणि पावसाळ्यात बरसणारा पाऊस यामुळे वर्षातले सात महिने हा परिसर निसर्गरम्य असतो. म्हणून पावसाळी पर्यटन या भागात विकसित करणे गरजेचे आहे.

एमटीडीसीचे रिसॉर्ट, उद्याने, बोटिंग सुविधा, मासेमारी, पाण्यातले खेळ, पॉइंट विकसन इत्यादी गोष्टींचा जाणीवपूर्वक विकास गरजेचा.

तिन्ही धरणांचे जलाशय मध्यवर्ती धरून त्या बाजूने पर्यटन केंद्रांची निर्मिती केल्यास अधिक योग्य होईल. 

पर्वतप्रेमींना व जंगल भटकंती आवडणाऱ्यांसाठी पदरगड, कलावंतीणीचा महाल, पेठचा किल्ला इत्यादी गडांच्या परिसरात पोषक वातावरण निर्माण करता येण्यासारखे आहेत. 

भोरगड, शंभूचा डोंगर, कोटेश्वर, शिंगी, गडदचा डोंगर हे डोंगर छोट्या ट्रेकिंगसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. 

कळमोडी हे छोटेसे धरण एका मोठ्या तळ्यासारखे आहे. त्याच्या कडेने पर्यटन केंद्र उभे राहू शकते. भामा आसखेड धरणाच्या परिसरात लोक आता हॉली डे होम उभारू लागले आहेत. कृषी पर्यटन ही संकल्पना विकसित करण्यासाठी हा परिसर उत्कृष्ट आहे.

येलवाडीत अध्यात्म केंद्र... 
येलवाडी येथील जवळपास १०० एकर गायरान जागा पवित्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज अध्यासन अध्यात्म केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणानुसार (पीपीपी) बांधण्यात यावे, अशी मागणी आमदार सुरेश गोरे यांनी केली. त्यावर पर्यटन विभागाकडून खासगी संस्थांना आमंत्रित करण्यात येऊन त्या ठिकाणी अध्यात्म केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

बारा ज्योतिर्लिंगाच्या धर्तीवर विकास
खेड तालुक्‍यातील शंकराची १२ पुरातन मंदिरे १२ ज्योतिर्लिंगाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. याबाबतचा जवळपास पाच कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्याचे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले. बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महामंडळाचे पुणे विभागाचे व्यवस्थापक दीपक हरणे आणि जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खेड तालुक्‍यात पर्यटनपूरक व्यवसाय निर्माण व्हावेत यासाठी संपूर्ण तालुक्‍याचा पर्यटन आराखडा तयार करून सरकारला सादर केला आहे. यानुसार वनपर्यटन वाढावे यासाठी वन विभागामार्फत भोरगिरी (३ कोटी), शिंगेश्वर (दीड कोटी), शंभू (पावणेचार कोटी) आणि कुंडेश्वर (दीड कोटी) या ठिकाणी पर्यटन विकासासाठी निधी मंजूर असून कामे सुरू आहेत. 
- सुरेश गोरे, आमदार खेड

Web Title: Khed Tourism Development Suresh Gore