खोडदला बिनभिंतीच्या शाळेचीही मुलांना गोडी!

रवींद्र पाटे
सोमवार, 21 जानेवारी 2019

नारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले? अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण घेऊ शकतात. हे दाखवून दिले आहे, जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्या पुढाकारातून ऊस तोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांसाठी खोडद (ता. जुन्नर) येथे सुरू असलेल्या बिनभिंतीच्या शाळेने. 

प्रतिकूल परिस्थितीमुळे इच्छा असूनही काही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम मेमाणे यांनी जुन्नर तालुक्‍यात १९ डिसेंबर २०१८ रोजी सुरू केली.

केंद्र प्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी व काही शिक्षकांच्या मदतीने खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, खामगाव, सुराळे, कोळवाडी, काले, निरगुडे, सोमतवाडी भागात केलेल्या पाहणीत १४३ शाळाबाह्य मुले आढळून आली. या मुलांच्या पालकांशी संवाद साधून ११८ मुलांना जवळच्या सोयीच्या शाळेत दाखल करण्यात आले. सर्वाधिक शाळाबाह्य मुले खोडद परिसरात आढळून आली. कौटुंबिक परिस्थितीमुळे खोडद येथील ऊसतोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांनी आपली मुले शाळेत पाठविण्यास नकार दिला. मेमाणे, सहकारी शिक्षक व स्थानिकांनी पालकांशी संपर्क साधून त्यांची अडचण समजून घेतली. ‘आम्ही पहाटे पाच वाजता ऊस तोडणीसाठी जातो. विटा तयार करण्याचे कामही पहाटेच करावे लागते. मुलांना शाळेत पाठविल्यास आमच्या कोपीचे राखण, लहान मुलांचा सांभाळ कोण करणार. आमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत,’ अशा अडचणी पालकांनी सांगितल्या. त्यावर मेमाणे यांनी हे मजूर व कामगार राहत असलेल्या ठिकाणीच सायंकाळी शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. एक जानेवारीपासून खोडद येथे सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या वेळेत बिनभिंतीच्या शाळेत वर्ग सुरू झाला. सुमारे पंचवीस (दहा मुली व पंधरा मुले) शाळाबाह्य मुले या शाळेत दाखल झाली. एकूणच या बिनभिंतीच्या शाळेच्या माध्यमातून सटाणा, तरडी (जळगाव), एरंडोल, धुळे, बीड, चाळीसगाव भागातील ऊसतोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ज्ञानमंदिराची कवाडे खुली झाली आहेत. 

दानशूरांची मदत
नारायणगाव येथील करसल्लागार रमेश भोसले यांनी पंचवीस मुलांना स्वेटर भेट दिले आहेत. खोडदचे उपसरपंच विजय गायकवाड, गुंडिराज थोरात यांनी मुलांसमवेत वाढदिवस साजरा करून शालेय साहित्य भेट दिले. डिसेंट फाउंडेशनचे जितेंद्र बिडवई, एस. बी. आतार यांनी खाऊवाटप करून मुलांना दफ्तर व आवश्‍यक साहित्य देण्याची तयारी दाखवली आहे.

वीस दिवसांत पंधरापर्यंतचे पाढे पाठ
मागील वीस दिवसांत या मुलांना मुळाक्षरे, बाराखडीची ओळख झाली असून बेरीज, वजाबाकीही ती करीत आहेत. रिंकू नावाच्या मुलीचे चक्क पंधरापर्यंतचे पाढे पाठ झाले आहेत. पाच विद्यार्थी वाचन करू लागले आहेत. या मुलांचा आत्मविश्‍वास वाढला असून, त्यांना शाळेची गोडी निर्माण झाली असून, काही पालकसुद्धा मुलांसमवेत रात्रशाळेत येत आहेत. 

Web Title: Khodad Without Wall School Student