किडनी ट्रान्सप्लांट मिशन

अनिल सावळे 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

किडनी (मूत्रपिंड) विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना सतत डायलिसिसचे उपचार घ्यावे लागतात. तसेच किडनी प्रत्यारोपणाचा वैद्यकीय खर्च परवडत नाही, अशा रुग्णांच्या मदतीसाठी धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

पुणे - किडनी (मूत्रपिंड) विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना सतत डायलिसिसचे उपचार घ्यावे लागतात. तसेच किडनी प्रत्यारोपणाचा वैद्यकीय खर्च परवडत नाही, अशा रुग्णांच्या मदतीसाठी धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री सहायता निधीसह विविध वैद्यकीय योजनांचा समन्वय साधत एकाच छताखाली या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा  मिळणार आहे. 

किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो. किडनी विकाराने त्रस्त बहुतांश गरीब रुग्णांना पैशांअभावी उपचार घेता येत नाहीत. एखाद्या योजनेतून मिळणाऱ्या निधीतून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च पुरेसा नसतो. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना ही शस्त्रक्रिया करणे शक्‍य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अशा रुग्णांना सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख यांच्या उपस्थितीत हॉस्पिटल असोसिएशन (पुणे), पिंपरी चिंचवड महापालिका, ससून आणि औंध रुग्णालय; तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांचे प्रतिनिधी  एकत्रित काम करतील; तसेच किडनी विकाराने त्रस्त रुग्णांवर मोफत उपचारासाठी निधी उभारण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

किडनी विकाराने त्रस्त रुग्णांसाठी संबंधित विभागांच्या समन्वय आणि सहकार्याने ही योजना राबविण्यात येणार आहे; तसेच निधी उभा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्‍तींची मदत घेण्यात येणार आहे. ही योजना डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
- नवनाथ जगताप,  धर्मादाय उपायुक्‍त

नावनोंदणी  एक डिसेंबरपासून
किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनी येत्या एक डिसेंबरपासून धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयात नावनोंदणी सुरू करण्यात येत आहे. ज्या रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावयाची आहे, अशा रुग्णांना रक्‍ताच्या नात्यातील किडनीदाता (डोनर) देणे अनिवार्य आहे. विस्तृत माहितीसाठी धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidney Transplant Mission

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: