जन्मदात्यानेच दिले जीवनदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे  - मूत्रपिंड निकामी झाल्याने तरुण मुलाच्या जिवावर बेतलेल्या संकटातून त्याला वाचविण्यासाठी त्याच्या पित्याने मूत्रपिंड दान केले. जिवंतपणी दान केलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील पहिली शस्त्रक्रिया पुण्यातील ससून रुग्णालयात बुधवारी झाली. 

पुणे  - मूत्रपिंड निकामी झाल्याने तरुण मुलाच्या जिवावर बेतलेल्या संकटातून त्याला वाचविण्यासाठी त्याच्या पित्याने मूत्रपिंड दान केले. जिवंतपणी दान केलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील पहिली शस्त्रक्रिया पुण्यातील ससून रुग्णालयात बुधवारी झाली. 

पुण्यापासून अडीचशे किलोमीटरवर असलेल्या बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्‍यातील गौंडगावमध्ये राहणारे गंडुले हे शेतकरी कुटुंब. पत्नी, तीन मुले आणि एक सून आणि दोन नातवंडे असा 63 वर्षीय देविदास गंडुले यांचा परिवार. वयाच्या पस्तीशीतील त्यांच्या रामेश्‍वर या मोठ्या मुलाला मूत्रपिंडाचा विकार झाला. हा विकार इतक्‍या वेगाने बळावला की काही महिन्यांतच त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले. पत्नी, आठ आणि दहा वर्षांची दोन मुले असा संसार असलेल्या आपल्या मुलाच्या जिवावरच संकट ओढावल्याने रामेश्‍वरचे वडील देविदास हे मूत्रपिंड दानासाठी पुढे आले. सुरवातीला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची चौकशी केली. पण, त्याचा खर्च शेतकरी कुटुंबाला परवडण्याच्या पलीकडे होता. 

पावले ससून रुग्णालयाकडे 
मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यातील ससून रुग्णालयात होऊ शकते, अशी माहिती औरंगाबाद येथील रुग्णालयातून मिळाली. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाची पावले ससून रुग्णालयाकडे वळाली. 

सरकारी रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया 
ससून रुग्णालयात 1999 मध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर मरणोत्तर दान केलेले मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या चार शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. मात्र, जिवंतपणी मूत्रपिंड दान करून रक्ताचे नाते असलेल्या रुग्णावर ते प्रत्यारोपित करण्याची राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील पहिली शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात झाली. डॉ. अभय सदरे, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. भालचंद्र कश्‍यपी, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. योगेश गवळी, डॉ. सचिन भुजबळ, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अमित भांगले, डॉ. संयोगिता नाईक, डॉ. हरीश टाटिया, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. भारती दासवाणी या डॉक्‍टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. 

शस्त्रक्रियेचा खर्च 
खासगी रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी किमान पंधरा लाख रुपये खर्च येतो. यासाठी मूत्रपिंड दान आणि प्रत्यारोपण अशा दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतात. मात्र, ससून रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

मूत्रपिंड प्रत्यारोपणासारखी आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यापर्यंत सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढला आहे, हा संदेश यातून मिळत आहे. तज्ज्ञ, कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी रुग्णालय सुसज्ज होत असल्याने या शस्त्रक्रिया करणे शक्‍य होत आहे. 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 

मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया (मरणोत्तर दान) 
2018 (मार्चअखेर) - 22 
2017 - 79 
2016 - 83 

मूत्रपिंडदानाच्या प्रतीक्षा यादीवरील रुग्ण 
874 

Web Title: Kidney transplantation is the first surgery at Sassoon Hospital