खबऱ्यांच्या नेटवर्कमुळे मारेकरी जाळ्यात

खबऱ्यांच्या नेटवर्कमुळे मारेकरी जाळ्यात

संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट चार, दरोडा प्रतिबंधक पथक आणि येरवडा पोलिसांची दमछाक झाली. मात्र, खबऱ्यांचे मजबूत नेटवर्क, तांत्रिक तपास आणि तपासातील चिकाटी यामुळे पोलिसांच्या सांघिक प्रयत्नांना यश आले.
 

संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी. ती खराडी बायपास येथील सिनेक्रॉन कंपनीत नोकरीस होती. सात ऑक्‍टोबर २००९ रोजी ती काम संपवून रात्री घरी जाण्यासाठी बसथांब्यावर उभी होती. कॅबचालक योगेश अशोक राऊत हा तेथून जात होता. त्याने नयनाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कॅब थांबविली. योगेश आणि त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कॅबमध्ये तिच्यावर अत्याचार सुरूच होते. तिने हात जोडून सोडून देण्याची विनवणी केली. परंतु त्या नराधमांना तिची थोडीही दया आली नाही. त्यानंतर तिचा ओढणीने गळा आवळून दगडाने ठेचून खून केला. दरम्यान, मुलगी घरी आली नाही, या चिंतेने नयनाच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिचा मृतदेह राजगुरुनगरजवळ जरेवाडी येथे आढळला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट चारचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्या पथकात पोलिस अधिकारी शौकतअली सय्यद, कारभारी हंडोरे, कर्मचारी अस्लम अत्तार, सचिन कोकरे, अशोक भोसले आणि स्टीव्हन सुंदरम होते. त्यांना प्राथमिक तपासात विमाननगर परिसरातील एटीएममधून नयनाच्या कार्डवरून पैसे काढल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तेथील आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण आरोपींनी चेहरे झाकलेले होते. त्यांचे केवळ डोळे दिसत होते. दुसऱ्या दिवशीही आरोपींनी एका एटीएममधून पैसे काढले होते. पण तेथे सीसीटीव्ही नव्हते. पोलिसांनी सिनेक्रॉन कंपनीच्या परिसरात कॅबचालकांकडे चौकशी केली. त्यांना ते फोटो दाखविले. पण चेहरा झाकल्यामुळे ओळख पटत नव्हती. काही कॅबचालकांना विश्‍वासात घेऊन चर्चा केली. त्यावेळी काही कॅबचालकांचे काय उद्योग सुरू आहेत, याची माहिती पोलिसांना दिली.

सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी खेड तालुक्‍यातील योगेश अशोक राऊत, राजेश पांडुरंग चौधरी आणि महेश बाळासाहेब ठाकूर या तिघांना १६ ऑक्‍टोबर २००९ रोजी घरातून अटक केली. त्यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, विश्‍वास हिंदूराव कदम हा पसार झाला होता. तो निगडी येथून उत्तर प्रदेशात गेला. तेथे तो कंटेनरवर क्‍लीनर म्हणून काम करीत होता. त्याचा माग काढताना तो कर्नाटकात गेल्याचे समजले. 

पोलिस कर्नाटकात गेले. तेथे गेल्यानंतर तो मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील एका ढाब्यावर जेवण करीत असल्याची पक्‍की खबर मिळाली. पोलिसांनी त्या ढाब्यावर जाऊन कदमच्या मुसक्‍या आवळल्या. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या गुन्ह्याच्या तपासाला गुड डिटेक्‍शन पुरस्काराने गौरविण्यात आले. या गुन्ह्याचा तपास आणि सक्षम पुरावे गोळा करण्यात येरवडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

असा सापडला योगेश राऊत 
या  गुन्ह्यातील मुख्य आरोपी योगेश याला ससून रुग्णालयात त्वचारोग विभागात नेण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास तो लघुशंकेच्या बहाण्याने पसार झाला. गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी पळून गेल्यामुळे पोलिसांची झोप उडाली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच वेळी दिल्लीतील निर्भया प्रकरणाची देशभर चर्चा सुरू होती. या घटनेमुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले. योगेशला पकडण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या पथकात सहायक फौजदार देविदास भंडारे, पोलिस कर्मचारी संतोष जगताप आणि प्रदीप सुर्वे होते.

योगेशचा शोध घेण्याचे आव्हान वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांनी स्वीकारले. त्यांनी येरवडा कारागृहापासून तपासाला सुरवात केली. त्याच्या बरॅकमधील काही कैद्यांकडे चौकशी केली. त्या बरॅकमध्ये सागर सहानी खून खटल्यातील गुजरातमधील गॅंगस्टर नितीन मोढा होता. योगेशला पळून जाण्यास त्याने मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. मोढाचे सूरत येथील खंडणीच्या गुन्ह्यातील बादलसिंग याच्याशी संबंध होते. पोलिस सुरतला आणि मोढाच्या गावी पोरबंदर येथे गेले. बादलसिंगचे बिहारमधील सोनूसिंग याच्याशी संबंध असून तो मुंगीर कारागृहात असल्याची माहिती मिळाली. सोनूसिंगचे दिल्लीत नेटवर्क आहे. त्यामुळे योगेश दिल्लीत गेला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी दिल्ली गाठली. स्थानिक पोलिस आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू होता. गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली.

गोवेकर यांचे खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत आहे. त्यांनी दिल्लीतील एका गुन्हेगाराला फोन लावून योगेशबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतील त्या गुन्हेगाराच्या मदतीने योगेशची माहिती काढण्यास सुरवात केली. पोलिसांनी योगेश सापडेल याची आशा सोडून दिली होती. पण तेवढ्यात योगेश हा दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे राहत असून एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हाऊसकिपिंगचे काम करीत असल्याचे समजले. त्याने रवी भल्ला नाव धारण केले होते. पोलिसांचे पथक त्या हॉटेलमध्ये पोचले. पण तेथून तो शिर्डीकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर प्रवास करून शिर्डीतून योगेशला अटक केली.

कुटुंबीयांवर पाळत 
पोलिसांनी योगेशच्या कुटुंबीयांवर लक्ष केंद्रित केले होते. योगेशची आई अंगणवाडी सेविका होती. तसेच, त्याची पत्नी एका मॉलमध्ये तर भाऊ खासगी कंपनीत कामास होता. योगेशच्या आईचा यवत येथील एका पोतराजावर विश्‍वास होता. पोलिसांनी त्याला विश्‍वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यावर पोतराजाने योगेशच्या जीवाला काही बरे-वाईट होऊ नये, त्यासाठी बकरे कापावे लागेल. त्या पूजेला योगेशला यावे लागेल, असे योगेशच्या आईला सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पण योगेश तेथे आला नाही. त्यामुळे पोलिसांचा तो प्रयत्न फसला. योगेशचा बालपणीचा मित्र आणि त्याच्या पंढरपूर येथील मित्रांकडून माहिती काढली. त्यावेळी तो पुण्यात वाकड येथे आई आणि पत्नीला भेटून गेल्याचे समजले. तसेच तो दुचाकीवरून पत्नीला शिर्डीला घेऊन गेला होता, अशी माहिती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com