जंगलच्या राजाचे दर्शन पुढील वर्षी 

lion
lion

पुणे - पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांना जंगलच्या राजाचे म्हणजे सिंहाचे दर्शन व्हावे, यासाठी करावी लागलेली अडथळ्यांची शर्यत अजून संपलेली नाही. आधी जुनागढ प्राणिसंग्रहालयाची मान्यता आणि कागदपत्रांची पूर्तता यांत वेळ गेला आणि आता ही प्रक्रिया पूर्ण झाली; तर पुणे महापालिकेने खंदकाचा खुला पिंजरा करण्याचे काम आता कुठे सुरू केले आहे. त्यामुळे पुणेकरांना सिंहदर्शनाचा योग येण्यास आणखी एक वर्ष लागणार आहे. 

कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात सिंह आणण्याची प्रक्रिया जवळपास तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी पुण्यातील पेशवे पार्कमध्ये सिंह होता; परंतु त्यानंतर जवळपास एका तपाहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर पुण्यात पुन्हा एकदा सिंहाचे दर्शन होण्याची चिन्हे आहेत. प्राणिसंग्रहालयाने सिंह आणण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) पाठविला होता. प्राधिकरणाच्या अदला-बदल प्रकल्पांतर्गत या प्रस्तावाला साधारणत: दोन वर्षांपूर्वी मान्यता देण्यात आली. त्याप्रमाणे शहरातील संग्रहालयाने गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून (जुनागढ) सिंहाची एक जोडी पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले. याच प्रक्रियेला जवळपास एक-दीड वर्षाचा कालावधी लागला. 

आता सिंह आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी खंदकाचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे पुणेकरांच्या वाट्याला पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे. सिंहाच्या खंदकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत असून, पुढील वर्षी म्हणजे 2017 मध्ये या जंगलाच्या राजाचे पुण्यात आगमन होणार आहे. 

प्राणिसंग्रहालयात सध्या असणाऱ्या हत्तीच्या खंदकासमोरील जागेत सिंहासाठीचा नवीन खंदक तयार करण्यात येणार आहे. आता या जागेतील झाडे काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास दोन हजार 600 चौरस मीटर जागेत हा खंदक बांधण्यात येणार आहे. हे काम 2017 मध्ये पूर्ण होईल. 
- राजकुमार जाधव, संचालक, प्राणिसंग्रहालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com