Gas Leakage : बेकायदा गॅस विक्री बेतली जीवावर; गॅस गळती होऊन भाजलेल्या तिघांपैकी एकीचा मृत्यू kirkitwadi illegal gas selling gas leakage fire one death and two injured | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Geeta Chaudhary

Gas Leakage : बेकायदा गॅस विक्री बेतली जीवावर; गॅस गळती होऊन भाजलेल्या तिघांपैकी एकीचा मृत्यू

किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील माळवाडी येथे बेकायदा घरगुती गॅस सिलिंडरची विक्री करणे जीवावर बेतले असून, गॅस गळतीमुळे भाजलेल्या दुकानचालक व त्याच्या दोन मुलींपैकी एकीचा उपचारांदरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

गीता मन्नाराम चौधरी (वय 15, रा. प्रेम सुपर मार्केट, माळवाडी, किरकटवाडी ता. हवेली) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या मन्नाराम चौधरी (वय अंदाजे 45) व लहान मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मन्नाराम चौधरी यांचे किरकटवाडी येथील माळवाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. याच दुकानात ते घरगुती गॅस सिलिंडरची विक्री करत असत. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडर मध्ये गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोडाऊन भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी चौधरी बेकायदेशीरपणे हे गॅस भरत असत व दुकानातून त्या सिलिंडरची विक्री करत असत.

दि. १ जून रोजी सकाळच्या सुमारास मन्नाराम चौधरी व त्यांच्या दोन मुली असे तिघेजण गोडाऊन मध्ये मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडर मध्ये गॅस भरत असताना गॅस गळती झाली व आगीचा भडका उडाला. यात मन्नाराम चौधरी व त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या.

तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात भरती करुन घेण्यात न आल्याने थेट ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी यातील गीताचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच मन्नाराम चौधरी व लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे धोकादायकपणे बेकायदा घरगुती गॅस सिलिंडर विक्रीचा प्रश्न समोर आला आहे.

कोठून व्हायचा गॅस पुरवठा?

किरकटवाडी परिसरात तीन ते चार एजन्सींच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा होतो. या एजन्सींची वाहने दररोज सिलिंडर वितरणासाठी फिरत असतात. यापैकी कोणत्या एजन्सीचे कर्मचारी मन्नाराम चौधरी यांना बेकायदेशीरपणे सिलिंडर पुरवत होते याचा तपास होणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सिलिंडर संपले आहेत असे सांगणारे हे वितरक जादा पैसे घेऊन अशा विक्रेत्यांना मात्र मुबलक सिलिंडर पुरवतात. अशा प्रकारे आणखी कोणी हा 'धंदा' करतेय का याचाही तपास होणे आवश्यक आहे.

'जखमींना थेट ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने याबाबत अद्याप पोलीस ठाण्याला माहिती मिळालेली नाही. पोस्टाने ही माहिती आल्यानंतर सविस्तर कळेल. तत्पूर्वी हा गंभीर प्रकार असल्याने तातडीने याबाबत चौकशी सुरू करण्यास सांगितले आहे.'

- सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

टॅग्स :punefireaccidentdeathgas