सत्तांतराचे कारणही नरेंद्र,देवेंद्र यांचा करिष्मा

मिलिंद वैद्य
शुक्रवार, 10 मार्च 2017

पिंपरी चिंचवड महापालिका सर्व्हेक्षण विश्‍लेषण 

पिंपरी चिंचवड महापालिका सर्व्हेक्षण विश्‍लेषण 

लोकसभेच्या निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा करिष्मा महापालिका निवडणुकीतही प्रभावी ठरला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून इतिहास घडविला. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा कोणताही परिणाम निवडणुकीत जाणवला नाही. मात्र, सत्ता मिळवूनही भारतीय जनता पक्षाच्या टक्केवारीत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणतीही वाढ झालेली नाही, हेही तितकेच खरे. त्या ऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता गमावली असली तरी त्यांची आठ टक्के मते वाढली आहे. या निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये घोटाळा झाल्याची शक्‍यता राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यक्त केली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवार व नेत्यांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा हा मुद्दाही दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपची सत्ता, राष्ट्रवादी पायउतार आणि कॉंग्रेस महापालिकेतून हद्दपार अशी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये ठरली.

सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली. पण, त्यांनी केलेल्या विकासाला मतदारांनी नाकारले. त्यांच्या कारभाराच्या विरोधात हे मतदान झालेले दिसते. "सकाळ'ने केलेल्या सर्व्हेनुसारच मतदारांचा कौल दिसून आल्याचे निकालावरून स्पष्ट होते. निवडणुकीत मतदान करताना कोणते घटक महत्त्वाचे ठरले. यावर उमेदवाराची पार्श्‍वभूमी असे उत्तर 47 टक्के नागरिकांनी दिले. तर पक्षाकडे पाहून मतदान केल्याचे 26 टक्के नागरिकांनी म्हटले आहे.

परिवर्तनाच्या बाजूने कौल
या निवडणुकीत झालेले परिवर्तन हे ऐतिहासिक ठरले. महापालिकेच्या स्थापनेपासून येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेथे भाजपने मिळविलेले यश देदीप्यमान म्हटले पाहिजे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी गजानन बाबर आमदार असताना शिवसेना सत्तेवर येईल अशी स्थिती होती. पण त्या परिस्थितीचा लाभ शिवसेनेला उठवता आला नाही. या निवडणुकीत शिवसेनेला नाकारल्याचे स्पष्ट झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेल्यावेळी कॉंग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. या वेळी एकही मिळविता आली नाही. एका राष्ट्रीय पक्षाचा दारुण पराभव पहावयास मिळाला. सर्व्हेमध्ये 69 टक्के मतदारांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला. तर 31 टक्के लोकांनी विरोधात मत नोंदविले. सर्व्हेतील लोकांनी 48 टक्के भाजपला मत दिल्याचे मान्य केले तर 52 टक्के लोकांनी भाजपला मत दिले नसल्याचे सांगितले.

मोदी लाट कायम
भाजपला मत देण्यात सर्वांत प्रभावी घटक कोणता या प्रश्‍नावर सर्वाधिक 46 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रभावी नेतृत्व पाहून मतदान केले. त्या खालोखाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 17 टक्‍के लोकांनी पसंती दर्शविली आहे. 12 टक्के लोकांनी इतरांहून वेगळा पक्ष असल्याने भाजपला मतदान केले तर स्थानिक उमेदवार पाहून 16 टक्के लोकांनी मतदान केले. पारदर्शकतेच्या मुद्याला 10 टक्के लोकांनी पसंती दिली. मात्र सत्ता मिळवूनही गेल्या विधानसभेच्या तुलनेत पक्षाची मते 37 टक्‍क्‍यांवर कायम राहिली. पक्षाला दहा टक्के नवमतदारांना आपल्याकडे वळविता आलेली नाहीत. या वेळी एकूण मतदान सात लाख 77 हजार 666 इतके झाले. त्यापैकी अवघे 2 लाख 50 हजार इतके मतदान पक्षाला झाले.

शिवसेनेची टक्केवारी घसरली
महापालिकेत शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यांना अवघ्या 9 जागा मिळाल्या. गेल्यावेळी त्या 14 (मते 23 टक्के) होत्या. त्यांच्या मतांमध्येही मोठी म्हणजे 7 टक्‍क्‍यांनी घट झालेली दिसते. शिवसेनेला 16 टक्के मतदान झाले. तरीदेखील जे मतदान झाले त्यात 39 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केले, तर 35 टक्के लोकांनी स्थानिक उमेदवाराकडे पाहून मतदान केले.

शरद पवार यांचे नेतृत्व मान्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाकारणाऱ्यांमध्ये 52 टक्के, तर पक्षाला मतदान करणाऱ्यांत 48 टक्के मतदार आहेत. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार आजही आहे. एकूण 41 टक्के लोकांनी फक्त शरद पवार यांचे नेतृत्व विचारात घेऊन राष्ट्रवादीला मतदान केले. पक्षाकडे पाहून अवघ्या 11 टक्के लोकांनी मते नोंदविली आहेत, तर स्थानिक उमेदवार पाहून 48 टक्के मतदारांनी राष्ट्रवादीला पसंत दिली. निवडणुकीत पक्षाचा पराभव (36 जागा) झाला असला तरी या वेळी आठ टक्के मतदान गेल्या विधानसभेपेक्षा जास्त झाले आहे. राष्ट्रवादीने इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. जर त्यात घोटाळा असेल तर राष्ट्रवादीला वाढलेले आठ टक्के मतदानही चुकीचे म्हणायला हवे.

कॉंग्रेस निष्प्रभ
या सर्व्हे दरम्यान अवघे 14 टक्के नागरिकांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मते टाकली, तचर 86 टक्के लोकांनी नाकारले. राहुल गांधी हेच चलणी नाने आहे. कारण मिळालेल्या मतांमधील 40 टक्के मते त्यांच्यामुळे मिळाल्याचे सर्वेक्षण सांगते. आकडेवारी पाहता प्रत्यक्षात पक्षाची अवस्था फारच दारुण झाली. बहुतेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. गेल्यावेळी 14 नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसचा या वेळी एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. सध्याची राजकीय परिस्थिती बघता पक्षाला उभारी घेणे आता कठीण दिसत आहे. या शिवाय मनसे, समाजवादी पार्टी, एमआयएम पक्षांची कामगिरीही नगण्य ठरली. त्या तुलनेत अपक्षांच्या बाजूने 31 टक्के मत नागरिकांनी नोंदविले आहे.

सदोष इव्हीएम मशिन व क्रॉस व्होटिंग
इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा असल्याची शक्‍यता 59 टक्के लोकांनी व्यक्‍त केली आहे. उर्वरित 41 टक्के लोकांनी ही शक्‍यता फेटाळली आहे. मतदानामध्ये सर्व प्रभागांत एकाच पक्षाच्या उमेदवारांना मत देणाऱ्यांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपर्यंत राहिले आहे. उर्वरित लोकांनी प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या पॅनेलमधील उमेदवारांना मतदान केल्याचे मत नोंदविले आहे. याचाच अर्थ 50 टक्के क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट होते. सुमारे 55 टक्के लोकांनी सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मत दिल्याचे म्हटले आहे.

पारदर्शकता या मुद्द्यावर 80 टक्के लोकांनी होकार दर्शविला आहे. त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराला द्यायला हवे. नोटाबंदीचा परिणाम निवडणुकीवर झाला नसल्याचे मत 36 टक्के लोकांनी मांडले आहे. तर नोटाबंदीला कौल दिल्याचे 31 टक्के लोकांचे म्हणणे आहे. उर्वरित 32 लोकांनी निकाल म्हणजे नोटाबंदीला पाठिंबा नव्हे, असे मत स्पष्ट केले आहे. एकूणच परिवर्तनाची ही लढाई भाजपच्या पारड्यात वजन टाकून जाणारी ठरली आहे. आता पारदर्शक कारभाराची अपेक्षा त्यांना निवडून देणाऱ्यांनी ठेवली तर ती चूक ठरू नये एवढेच !

 

Web Title: know why voters chose bjp in pcmc?