बाबासाहेबांच्या निवासात वंचितांचे ज्ञानार्जन (व्हिडिओ)

मंगेश कोळपकर
रविवार, 14 एप्रिल 2019

आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली वास्तू राष्ट्रीय स्मारक व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, येथील अभ्यासिकेतून उच्च शिक्षित युुवकांची नवी पिढी घडत असून, त्यासाठी सहकार्याचे अनेक हात पुढे येत आहेत. 

- ऍड. रंजना भोसले, माजी नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे 

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून एकीकडे न्यायालयीन संघर्ष सुरू असला, तरी दुसरीकडे या वास्तूत अभ्यासिका सुरू असून, दुर्बल घटकातील विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत. 

तळेगाव दाभाडे येथे डॉ. आंबेडकरांनी 1948 मध्ये 23 एकर जागा एका ख्रिस्ती मिशनऱ्याकडून 16 हजार रुपयांना विकत घेतली होती. त्यातील सात गुंठे जागेत त्यांनी बंगला बांधला. 1948 ते 1954 दरम्यान बाबासाहेबांनी या बंगल्यात 56 वेळा वास्तव्य केल्याची नोंद आहे. सध्या हा बंगला नगरपरिषदेच्या ताब्यात असून, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत

बाबाबासाहेबांच्या निधनानंतर हा बंगला त्यांचे पुत्र यशवंत आणि पत्नी माई यांच्या नावावर झाला. पुढे कौटुंबिक वादातून न्यायालयाने लवाद नियुक्त करून हा बंगला आणि लगतची जमीन विकली. तेथे आता अल्टिनो कॉलनी साकारली आहे. 

दरम्यान, तळेगाव दाभाडेच्या माजी नगराध्यक्षा ऍड. रंजना भोसले यांनी आंबेडकरप्रेमींच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नातून 2012 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला ताब्यात घेऊन नगरपरिषदेच्या ताब्यात दिला. मात्र, बंगला विकत घेतलेल्या नागरिकाने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिचा निकाल लागल्यावर राष्ट्रीय स्मारकाचा निर्णय होईल. 

सध्या या बंगल्यात अभ्यासिका असून, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी तेथे अभ्यास करीत आहेत. ऍड. भोसले यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून पुस्तके आणि सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अभ्यासिकेतील दोन युवकांची जिल्हा न्यायालयात नियुक्ती झाली आहे. एकाने राज्य सेवेच्या परीक्षेत यश मिळविले आहे. आंबेडकर यांचे खरेदीखत, घरपट्टी, देखरेखीसाठी पाठविलेली पत्रे हा दस्तऐवज तेव्हाचे "केअर टेकर' दत्ताजी गायकवाड यांचे पुत्र बृहस्पती गायकवाड यांच्याकडे आहे. 

भारतीय दलित सेनेचे अध्यक्ष सुनील यादव आणि "मेरे अपने'चे बाळासाहेब रुणवाल यांनीही येथे स्मारक व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

बाबासाहेबांना आमच्या आई-वडिलांनी हाताने स्वयंपाक करून वाढला आहे. येथे शिक्षण संस्था निर्माण करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु, आता किमान राष्ट्रीय स्मारक तरी होणे गरजेचे आहे. 

- बृहस्पती गायकवाड, बंगल्याचे केअर टेकर 

Web Title: Knowledge in the house of Babasaheb