Kolhapur Flood : अर्ध्या तासातच बारामतीतून 1 कोटींची मदत; पवारांच्या उपस्थितीत बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आज दुपारी रयत भवन येथे सर्वांनी एकत्र जमून मदतीचे नियोजन करण्याचे ठरले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या बैठकीबाबत माहिती मिळाल्यानंतर ते स्वतःच या बैठकीसाठी आवर्जून आले. अन बघता बघता मदतीचा आकडा थेट एक कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे अनेकांनी उस्फूर्तपणे मदत देऊ केली.

बारामती शहर : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत गोळा करण्यासाठीचा निर्णय बारामतीकरांनी आज सकाळीच घेतला होता. आज दुपारी रयत भवन येथे सर्वांनी एकत्र जमून मदतीचे नियोजन करण्याचे ठरले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या बैठकीबाबत माहिती मिळाल्यानंतर ते स्वतःच या बैठकीसाठी आवर्जून आले. अन बघता बघता मदतीचा आकडा थेट एक कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे अनेकांनी उस्फूर्तपणे मदत देऊ केली.

विद्या प्रतिष्ठानच्या वतीने 50 लाख...
या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 25 लाख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 25 लाख असे एकूण 50 लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी तेथील शैक्षणिक संस्थांना ही रक्कम दिली जाणार आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने यावेळेस भरघोस मदत जाहीर करण्यात आली.

संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले , माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर यांनी मदतीचे आवाहन केले तर गटनेते सचिन सातव यांनी आभार व्यक्त केले.

शरद पवारांच्या उपस्थितीत मदत गोळा करण्यास प्रारंभ झाल्यावर अनेकांनी उस्फूर्तपणे विविध प्रकारची मदत देऊ केली. यामध्ये रोख रकमेसह साखर कारखान्याच्या वतीने साखर तर व्यापाऱ्यांच्या वतीने गहू, ज्वारी, तांदूळ यासारखे धान्य तसेच पाणी, औषधे व कपडे पूरग्रस्त भागातील बांधवांच्या मदतीसाठी पाठविले जाणार आहेत.

रयत भवन येथे मदत स्वीकारली जाणार...
दरम्यान शरद पवार यांनी ज्या बारामतीकरांना वस्तू धान्य किंवा रोख रक्कम या स्वरुपात मदत करायची आहे त्यांनी रयत भवन येथे ही मदत जमा करावी असे आवाहन केले आहे. ज्या स्वरूपात मदत दिली जाईल त्याची पावती देण्याचीही सूचना पवार यांनी यावेळी केल्या. रयत भवन येथून ही मदत पूरग्रस्त भागांमध्ये गरजेनुसार पाठवली जाणार आहे.

दरम्यान नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव व मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडुजकर यांना बँकेत खाते उघडण्याच्या सूचना देत गरजेनुसार लागेल त्या वस्तू खरेदी करून त्या पूरग्रस्त भागात पाठविण्याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Rs 1 cr from Baramati in half an hour