मृत्यूच्या ठेकेदारांना आवरा...

अनिल सावळे 
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कोंढव्यातील बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. गेल्या जुलैमध्ये बालेवाडी परिसरात  स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनांवरून गरीब कामगारांच्या जिवाला कवडीची किंमत नाही, हे दिसून येते. 

कोंढव्यातील बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. गेल्या जुलैमध्ये बालेवाडी परिसरात  स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला. या घटनांवरून गरीब कामगारांच्या जिवाला कवडीची किंमत नाही, हे दिसून येते. 

कोंढव्यातील बेक्‍स अँड केक्‍स या बेकरीत लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन बेकरीमालकांना अटक केली. बेकरीत पोटमाळ्यावर झोपलेले कामगार पहाटे आग लागल्यानंतर जिवाच्या आकांताने ओरडत होते; परंतु त्यांचा पिचलेला आवाज बेकरीच्या भिंती आणि लोखंडी शटरमधून बाहेर कोणाच्या कानी पडला नाही. आग आटोक्‍यात आल्यानंतर कामगारांचे मृतदेह एकमेकांशी घट्ट बिलगलेले होते. ते दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते. माणसाच्या जीवनाला काहीच किंमत नाही का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनाला पडला. या बेकरीचे निर्दयी मालक रात्री घरी जाताना कामगारांना बेकरीत कोंडून कुलूप लावत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले. रात्री बेकरीतील काम करून कामगार तेथेच झोपतात. काही चोरीस जाऊ नये म्हणून बेकरीचे मालक कुलूप लावून जात होते. शहरात इतर भागातही काही व्यावसायिक गरीब कामगारांच्या जिवाशी खेळत असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. बेकऱ्यांची तपासणी करणारे संवेदनहीन अधिकारी दुर्घटना घडल्याशिवाय झोपेतून जागे होत नाहीत. या वेळीही हेच चित्र दिसून आले.  

या घटनेवरून बालेवाडी येथील पार्क एक्‍स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ मजूर ठार झाल्याची आठवण ताजी झाली. या ठिकाणी बारा मजली इमारत उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली होती; परंतु १३ व्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू होते. महापालिकेने त्यांना नोटीस पाठवली; परंतु दोन मजल्यांच्या परवानगीसंदर्भात तपास कोठपर्यंत आला, हे अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी ११ जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरणे, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्‌स ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आर्किटेक्‍टसह पाच जणांना अटक केली; परंतु पाच महिन्यांनंतरही उर्वरित सहा बांधकाम व्यावसायिकांना अद्याप अटक झालेली नाही. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्‍न पडतो.    

पुण्यासह परिसरात शेकडो उत्तर भारतीय कामगार कष्ट करून कुटुंबाची उपजीविका चालवितात. येथे रात्रं-दिवस राबून आई-वडील आणि मुला-बाळांसाठी गावी पैसे पाठवून देत असतात; पण या कामगारांच्या सुरक्षिततेचे काय? एखाद्या कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना पैसे देऊन, त्यांचे तोंड बंद केले जाते. त्याऐवजी व्यावसायिकांनी कामगारांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिल्यास ही वेळच उद्‌भवणार नाही.

Web Title: kondhwa bakery case