शिवसेना, भाजपचे पानिपत; राष्ट्रवादीची सरशी

शिवसेना, भाजपचे पानिपत; राष्ट्रवादीची सरशी

कोंढवा-मीठानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असे राजकीय समीकरण गेली अनेक वर्ष होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र या बालेकिल्ल्यातच शिवसैनिक गारद झाले. माजी आमदार महादेव बाबर यांच्या प्रभावाखाली असलेल्या या प्रभागामध्ये तीन जागांवर लढणाऱ्या शिवसेनेला किमान दोन जागांवर यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेच्या उमेदवारांना पिछाडीवर टाकत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी या प्रभागातील तीनही जागा काबीज केल्या. भाजपलाही या प्रभागात अपेक्षित यश मिळवता आले नाही.

प्रभागात  १५७३ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला.  संपूर्ण शहरात दोन जागा मिळविणाऱ्या मनसेला या प्रभागाने खाते उघडून देण्यास मदत केली. विशेष म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ‘ड’ गटामधून मनसेचे साईनाथ बाबर निवडणूक लढवत होते. त्या गटामध्ये शिवसेनेने उमेदवारच उभा केलेला नव्हता. या गटामध्ये चुरस होती ती साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादीचे रईस सुंडके यांच्यामध्ये. भाजपचे महेंद्र गव्हाणे, काँग्रेसचे नुरुल्ला शेख, एमआयएमचे तौसिफ शेख, संभाजी ब्रिगेडचे सुभाष भोसले आणि अपक्ष म्हणून देवदास लोणकर या गटामध्ये रिंगणात होते. साईनाथ यांना पहिल्या दोन फेरीमध्ये अनुक्रमे ३२३३ व २९४० मते मिळाली, तर रईस यांना ७८६ आणि २००८ मते मिळाली. साईनाथ यांनी घेतलेली ही आघाडी तिसऱ्या व फेरीमध्ये १९०४ व १५०१ मते मिळवून कायम ठेवली. रईस यांना तिसऱ्या व चौथ्या फेरीत २८९९ व २९३५ मते मिळाली, मात्र ९५० मतांनी पिछाडीवर असल्यामुळे त्यांचा पराभव झाला. 

महिलांसाठीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या ‘ब’ गटामध्ये शिवसेनेकडून महादेव बाबर यांच्या पत्नी स्मिता, भाजपकडून अफसाना पानसरे, एमआयएमकडून तस्नीम पटेल, काँग्रेसकडून शलाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून परवीन शेख आणि मनसेकडून शबाना शेख या निवडणूक लढवत होत्या. याही गटामध्ये सुरवातीला आघाडीवर असलेल्या सेनेला राष्ट्रवादीकडून तिसऱ्या व चौथ्या फेरीमध्ये मात मिळाली. स्मिता बाबर यांचा तब्बल ११७५ मतांनी पराभव झाला. शेख यांना मिळालेली ३७२४ मते ही या गटामध्ये निर्णायक ठरली. 

मनसेची सर्वात प्रभावी कामगिरी ठरली ती मागास प्रवर्गासाठी असलेल्या ‘अ’ गटामध्ये. शिवसेनेच्या अमर पवळे यांना ५३७४ मते आणि मनसेच्या अमोल शिरस यांना ५०२८ मते मिळाली. सेना आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये फक्त ३४६ मतांचा फरक होता, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल गफूर पठाण यांनी ९७६८ मतांची मुसंडी मारून आपला विजय निश्‍चित केला. भाजपच्या अनुराधा मदन शिंदे यांना २०६० मते आणि एमआयएमचे मोहंमद हुसैन खान यांना १७३७ मते मिळाली. 

महिलांसाठीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या ‘क’ गटामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना व मनसेला रोखण्यात यश आले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढणाऱ्या व अनीस सुंडके यांच्या पत्नी हमिदा सुंडके यांना ८०६६ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी नगरसेवक भरत चौधरी यांच्या पत्नी सीमा यांना ६०९९ मते मिळाली. चौधरी यांचा तब्बल १९६७ मतांनी पराभव झाला. मनसेच्या सुप्रिया शिंदे यांना ४३८७ मते, तर भाजपच्या संगीता लोणकर यांना २२७० मते मिळाली. एमआयएमच्या मोबीना पटेल यांना १५२९ मते मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com