दादा, तुम्ही मुख्यमंत्री झाल्याची बातमी ऐकायची मनोमन इच्छा आहे...

शरद पाबळे
गुरुवार, 29 मार्च 2018

कोरेगाव भीमा (पुणे) : 'दादा, २४ वर्षानंतरही तुम्ही मनात जपलेला आपलेपणा भावला. आता डायबिटीसमुळे दृष्टी गेली, मात्र अजुनही तुम्ही मुख्यमंत्री झाल्याची बातमी ऐकायची मनोमन इच्छा आहे.... अशा भावना व्यक्त करीत पेरणे गावचे माजी सरपंच छबनराव वाघमारे यांनी २४ वर्षानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कोरेगाव भीमा (पुणे) : 'दादा, २४ वर्षानंतरही तुम्ही मनात जपलेला आपलेपणा भावला. आता डायबिटीसमुळे दृष्टी गेली, मात्र अजुनही तुम्ही मुख्यमंत्री झाल्याची बातमी ऐकायची मनोमन इच्छा आहे.... अशा भावना व्यक्त करीत पेरणे गावचे माजी सरपंच छबनराव वाघमारे यांनी २४ वर्षानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पेरणे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पेरणेचे माजी सरपंच छबनराव वाघमारे यांच्या घरी आवर्जुंन थांबले. यानिमित्ताने झालेल्या संवादातून जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला. पेरणे येथे वाघमारेवस्तीवरील जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या उद्धाटनासाठी १९९४ मध्ये तत्कालीन मंत्री असलेले अजित पवार आले होते. त्यावेळी छबनराव वाघमारे हे सरपंचपदी कार्यरत होते. त्यानंतर छबनराव यांचा राजकीय वारसा सांभाळणारे त्यांचे चिरंजीव माजी उपसरपंच राजेंद्र वाघमारे यांनी पुढाकार घेत २४ वर्षानंतर गावच्या पाणीयोजनेच्या उदघाटनासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले होते. यावेळी अजित पवार यांनी छबनराव यांची विचारपुस केली. यावेळी छबनराव यांना डायबिटीसमुळे अंधत्व आल्याचे समजल्याने पवार त्यांना भेटण्यासाठी आवर्जुंन त्यांच्या निवासस्थानी आले. यावेळी डायलिसीसला गेलेले छबनराव घरी आल्यानंतर त्यांची आस्थेने विचारपुस करीत २४ वर्षापुर्वीच्या राजकीय घडामोडींना उजाळाही दिला. दरम्यानच्या राजकीय घडामोडीत छबनराव दिसत नसल्याचे जाणवल्याचेही अजित पवार यांनी यावेळी त्यांनी नमुद केले. यावर २००२ पासून लागोपाठ आजारांचा सामना करावा लागल्याने राजकारणात सक्रीय सहभाग शक्य न झाल्याचेही छबनराव यांनी स्पष्ट केले.

दादा, तुम्ही जुन्या कार्यकर्त्यांना विसरले नाहीत, पवार साहेबांबरोबरच तुम्हीही हा आदर्श जपल्यानं कौतुक वाटलं. दादा, डायबिटीसमुळे दृष्टी गेल्याने आता डोळ्यांनी दिसत नाही, मात्र मनाच्या नजरेतून तुमचा आपलेपणा भावला, मी सध्या पाहु शकत नसलो, तरी ‘तुम्ही मुख्यमंत्री झाल्याची बातमी ऐकायची मनोमन इच्छा असून.... मी ...अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो...की...हे एक वाक्य ऐकण्यासाठी माझे कान आतुरल्याचीही भावना छबनराव यांनी व्यक्त केली. यावर प्रकृती सांभाळा...मनाने खंबीर रहा... असा दिलासा देत नेहमी प्रमाणेच स्मितहास्य करीत अजित पवार यांनी छबनराव यांचा निरोप घेतला. तर २४ वर्षानंतर नेत्याने कार्यकर्त्यांशी जपलेला हा ऋणानुबंध पाहून छबनराव यांच्या पत्नी सौ. कमल वाघमारे याही भारावल्या.

Web Title: koregaon bhima ajit pawar cm and perne gaon deputy sarpanch