मिलिंद एकबोटे यांना घरचे जेवण नाकारले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कोरेगाव भीमा येथील दगडफेक, जाळपोळप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. 14 मार्च रोजी न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांनी न्यायालयीन कोठडीत घरचे जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी हा आदेश दिला.

कोरेगाव भीमा येथील दगडफेक, जाळपोळप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. 14 मार्च रोजी न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांना 15 मार्चला सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्यांना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली होती. न्यायालयात आजारपणाबद्दल सांगितल्यानंतर त्यांना आवश्‍यक ती औषधे पुरविण्याचा आदेश देण्यात आला होता. याच दरम्यान पोलिस कोठडीत वाढ होऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला योग्य तो औषधोपचार देण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, एकबोटे यांच्या वतीने सुरक्षेसंदर्भाने आणि घरगुती जेवण मिळावे, यासंदर्भाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये एकबोटेंना मधुमेहाबरोबर उच्च रक्तदाबाचादेखील त्रास आहे. यामुळे प्रत्येक दोन तासाला त्यांना जेवण आवश्‍यक असून पोलिसांनादेखील त्यांना वेळेवर जेवण देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे घरचे जेवण मिळाल्यास त्यांना आरोग्याचा प्रश्‍न उद्‌भवणार नसल्याची बाब न्यायालयात नमूद करण्यात आली होती. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेगळ्या बराकीमध्ये ठेवण्यासह दोन सुरक्षारक्षक देण्याची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला.

Web Title: Koregaon Bhima riot accused Milind Ekbote in Jail