कोरेगाव भीमा दंगलीतील बाधितांना मदत मिळावी : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

कोरेगाव भीमा : ''पेरणे- कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला मोठ्या संख्येने येथे गर्दी होणार, याची पूर्वकल्पना असूनही सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही? सरकार झोपले होते का?'' असा सवाल करून संबंधित बाधितांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

पेरणे (ता. हवेली) येथे पाणी योजनेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना कोरेगाव भीमा दंगलीबाबत अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''विजयस्तंभ हा हवेली तालुक्‍यात पेरणे येथे आहे. आपण 10 वर्षे पालकमंत्री असताना या परिसरात शांततेने कार्यक्रम होत असत. कधीच अनुचित प्रकार झाला नाही. मात्र, या एक जानेवारीला मोठ्या संख्येने येथे गर्दी होणार, याची पूर्वकल्पना असूनही सरकारने पुरेशी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही? सरकार झोपले होते का? शिवछत्रपती व शाहू, फुले आंबेडकरांचे आदर्श विचार पुढे नेण्याऐवजी काही मंडळी समाजात जाणीवपूर्वक दुही पसरविण्याचे काम करीत आहे.'' 

''या दंगलीचा जनतेप्रमाणे पोलिसांनाही फटका बसला. सणसवाडीत एका तरुणाचा नाहक जीव गेला. दंगलखोरांकडे आगी लावण्यासाठी स्प्रे सारखे साधन असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. दंगलीनंतर पोलिसांनी कारवाई करताना एकतर्फी कारवाई करीत अजूनही अटकसत्र सुरू ठेवल्याच्या तक्रारी आहेत. दंगलबाधितांना मुख्यमंत्र्यांनी 11 कोटींची मदत जाहीर केली. मात्र, त्याप्रमाणे अद्यापही बाधितांना मदत मिळाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित बाधितांना तातडीने मदत मिळाली पाहिजे.''

Web Title: Koregaon Bhima riot-hit people should get help from Government, demands Ajit Pawar