अनियमित बससेवेमुळे कोथरूडकर हैराण

Kothrud-Bus-Stop
Kothrud-Bus-Stop

पौड रस्ता - वाट पाहू नका, जी मिळेल ती बस पकडा आणि पुढे जात राहा. नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल, असा सल्ला कोथरूड बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या सुदेशला (नाव बदलले आहे) शेजारी उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने दिला. सुदेशला खराडीला जायचे होते; परंतु वेळेवर बस येत नसल्याने त्याची गैरसोय झाली. सध्या कोथरूडमध्ये बससेवेची ही परिस्थिती आहे.

महापालिकेकडे स्वतःच्या १,४१९ बस आहेत, तर ६५३ खासगी बस आहेत. अशा एकूण २०७२ बसपैकी फक्त १३८४ बस मार्गावर धावत आहेत. मागणीपेक्षा बसची संख्या कमी आहे. कोथरूड बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बस कमी आहे. 

कोथरूड बसस्थानकावरून पुणे स्टेशनला जाणाऱ्या एकूण आठ बस आहेत. पैकी दोनच चालू आहेत. प्रत्येक बसच्या चार फेऱ्या होतात. शिवाजीनगर येथे जाणारी एकच बस आहे. ही बस नादुरुस्त झाली, तर दुसरी बस मिळणे अवघड असते, याचा अनुभव नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत आहे. 
तसेच खराडीला जाणाऱ्या तीन बस सुरू आहेत. त्यापैकी दोन चालू आहेत. विमाननगरला जाणारी एक बस आहे; मात्र बस वेळेत येत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

तसेच कोथरूड बस स्थानकावर एनडीए गेट व वारजे गणपती माथा येथील डेपोतून बस येत असतात; मात्र बस स्थानकावरील कर्मचाऱ्यांना बस केव्हा सुटणार वा सुटेल की नाही याबाबत कल्पना नसते. त्यामुळे प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते. डेपोवरून येणाऱ्या बसमध्ये गर्दी असते. त्यामुळे बऱ्याचदा कोथरूड बसस्थानकामधून जाणे म्हणजे केवळ औपचारिकता राहते.

पीएमपीची हेल्पलाइन फक्त नावाला!
कोथरूड बसस्थानकवर पीएमपीने हेल्पलाइनचा एक फलक लावला आहे. त्यावरील नंबर खोडण्यात आलेला आहे. येथे एसएमएस सेवा व ईमेल दिला आहे; परंतु त्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

दिलेल्या वेळेत बस येत नाहीत. त्यामुळे आमचे हाल होत आहेत. बसची संख्या कमी असली तरी चालेल; पण वेळा पाळल्या पाहिजेत. वेळापत्रकाप्रमाणे बस असतील तर नागरिकांना बसथांब्यावर विनाकारण ताटकळत बसावे लागणार नाही. 
- संजय मिस्त्री, प्रवासी

बसचे वेळापत्रक कोथरूड बस स्थानकावर व प्रत्येक बसथांब्यावर हवे. प्रवाशांना आपल्याला हवी असलेली बस कुठे आली आहे, हे समजू शकले तर स्मार्ट सिटीमध्ये असल्यासारखे वाटेल. नाहीतर फक्त जाहिरातीपुरती स्मार्ट सिटी म्हणावे लागेल.
- क्षितिजा होले, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com