कोथरूडमध्ये होतेय टेकड्यांची लचकेतोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पौड रस्ता - कोथरूड परिसरातील टेकड्यांची अनधिकृतपणे फोड करून तिथे इमले उभारण्याचे उद्योग खुलेआम सुरू आहेत; मात्र याची दखल महापालिका घेईना, की कोणी लोकप्रतिनिधी. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून परिसरातील सोसायटीमधील नागरिकांनी लचकेतोडांच्या चौकशीची मागणी केली आहे.

पौड रस्ता - कोथरूड परिसरातील टेकड्यांची अनधिकृतपणे फोड करून तिथे इमले उभारण्याचे उद्योग खुलेआम सुरू आहेत; मात्र याची दखल महापालिका घेईना, की कोणी लोकप्रतिनिधी. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून परिसरातील सोसायटीमधील नागरिकांनी लचकेतोडांच्या चौकशीची मागणी केली आहे.

कोथरूडमधील तुळजाभवानी मंदिर टेकडी परिसर, बीडीपी क्षेत्र, सीग्मावन सोसायटी परिसरात डोंगरखोदाई व राडारोडा टाकून भूभागाचे मूळ प्रारूप बदलण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामबाग कॉलनी, सावली सोसायटी, एलआयसी कॉलनी, शिल्पा सोसायटी, स्नेह सोसायटीतील रहिवाशांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधला होता. तसेच सेव्ह अवर सोसायटी ऑर्गनायझेशनच्या वतीने १७ जानेवारीला याबाबत कोथरूड तलाठी कार्यालयात रीतसर अर्ज करण्यात आला.

दरम्यान, सीग्मावन सोसायटी परिसरात तलाठी कार्यालयातून पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या पाहणीत एका बांधकाम व्यावसायिकाने दोनशे ब्रास उत्खननाची परवानगी घेतल्याचे दिसले; परंतु प्रत्यक्षात चार हजार ब्रास राडारोडा हलवण्यात आल्याचे आढळले. या संदर्भातला अहवाल तलाठी कार्यालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर सेव्ह अवर सोसायटी ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले, की सीग्मावन सोसायटी परिसरातील डोंगर परिसरात बेकायदा उत्खनन व डोंगर तोड चालू असल्याचे आम्हाला आढळले. सुरवातीला एक ट्रक दिवसातून ४-५ वेळेस यायचा. आता ४-५ ट्रक दिवसभरातून ४०-५० ट्रीप घेऊन जातात. विचारले की महसूल खात्याची परवानगी असल्याचे सांगतात; पण दाखवत काहीच नाही. असे झाले तर उरले सुरले डोंगर पण नष्ट होतील. पुणे महापालिका बांधकाम विभागाचे अभियंता नागरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

परिसराची पाहणी करून कुठे गैरप्रकार सुरू आहे का? याची नोंद घेतो. वरिष्ठांना त्या संदर्भात माहिती देण्यात येईल. 
- रामदास पवार, उपअभियंता, बांधकाम विभाग, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

कोथरूडमधील तुळजाभवानी मंदिर टेकडी परिसर, बीडीपी क्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात भूक्षेत्रात बदल केले जात आहेत. त्याकडे महापालिका व महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.
- प्रशांत कोडोलीकर, पदाधिकारी सेव्ह अवर सोसायटी ऑर्गनायझेशन

महसूल विभाग व महापालिकेने आपल्या जमिनी व त्यामध्ये होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. खिडकीत येणारी झाडाची फांदी छाटायची झाली तर सर्वसामान्य नागरिकाला विविध परवानग्या घ्याव्या लागतात; विनापरवाना केलेल्या अनधिकृत कामांवर डोळेझाक केली जाते. 
- विलास इंगवले, नागरिक

Web Title: Kothrud Hill Illegal Digging