कोथरूड-पाषाण बोगदा तीन वर्षांत
कोथरूड - कोथरूड भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून कोथरूड ते पाषाण-पंचवटी असा बोगदा तयार केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर होणार आहे.
पाषाण ते कोथरूड हे अंतर कमी करून नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाणे सोयीचे व्हावे यासाठी बोगदा तयार करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. यासाठीही महापालिकेने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या बोगद्यामुळे शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडील भागाला जोडणारा नवीन मार्गही तयार होणार आहे.

पाषाण तसेच औंध, पंचवटी, बोपोडी या भागांतून नागरिकांना कोथरूड, कर्वेनगर तसेच वारज्याकडे जाण्यासाठी सध्या सेनापती बापट रस्त्याचा वापर करावा लागतो, तर कोथरूडकडून बालेवाडी-बाणेरकडे जाणारी बहुतांश वाहतूक मुंबई-पुणे बाह्यवळण महामार्गा वरून होत असते.
तसेच शहराच्या पूर्व आणि दक्षिण उपनगरांमधून आलेल्या वाहनांना पश्चिमेकडे जाण्यासाठी याच रस्त्यांचा वापर करावा लागतो. परिणामी, या दोन्ही रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होते.
ही बाब लक्षात घेऊन पाषाण-पंचवटी ते कोथरूड असा बोगदा करण्याचे काम पालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) प्रस्तावित होते. यासाठी प्रशासनाकडून सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव समितीमध्ये ठेवण्यात आला होता.
सल्लागाराच्या माध्यमातून या कामाचा व्यवहार्यता अहवाल, नकाशे, वाहतूक नियोजन आराखडा, वाहतूक विभाग, वन विभागाच्या आवश्यक मान्यता, टोपोग्राफी सर्वेक्षण, या स्वरूपाची कामे करून घेतली जाणार आहेत.
वेळ आणि इंधनाची होणार बचत
पौड रस्त्यावरील सुतारदरा वसाहती जवळून डोंगरामध्ये बोगदा निर्माण करून पाषाण येथील पंचवटी परिसरात हा रस्ता होणार आहे. या रस्त्यामुळे नागरिकांच्या ३० ते ४० मिनिटे वेळेची बचत होणार असून, ४ ते पाच किलोमीटर वळश्याचे अंतरही वाचणार आहे.
या रस्त्यासाठी वनविभाग, एआरआय आणि संरक्षण खात्याशी संबंधित एनसीएल व एआरडीई या संस्थांची परवानगी हवी होती. त्यातील वनविभाग व एआरआय या संस्थानी परवानगी दिली आहे. मात्र, संरक्षण खात्याच्या संस्थाकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. ही परवानगी मिळाल्यानंतर ड्रोनद्वारे सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
- श्रीनिवास बोनाला, मुख्य वाहतूक सल्लागार, पुणे महापालिका
कोथरूड - पाषाण रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच वनविभागाची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय संरक्षण विभागाच्या सर्वेक्षणासाठीच्या ना हरकत पत्रानंतर लगेचच सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, नगरसेवक
हा रस्ता पूर्ण झाल्यास वेळेची आणि इंधनाच्या बचतीसोबतच चांदणी चौकातील जीवघेण्या वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार नाही. पौड रस्त्यावरून त्वरित पाषाणला पोचता येईल.
- विजय मुंडले, नागरिक